Amravati Constiruency : पश्चिम विदर्भातील अमरावती लोकसभा मतदारसंघाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. महायुतीमध्ये अद्यापही सहा ते सात जागांवर पेच सुरू आहे. त्यातील एक मतदारसंघ अमरावती आहे. काँग्रेसचे दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली आहे. वानखडे हे महाविकास आघाडीतून लढणार हे निश्चित झाले आहे. अमरावतीची जागा भाजप कमळ या चिन्हावरच लढणार आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. परंतु उमेदवार कोण असेल हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
नागपूर येथे बोलताना बावनकुळे म्हणाले की, रामटेक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघाबाबत लवकरच निर्णय होणार आहे. ज्या पाच जागा भाजपकडे आहेत, त्यावर चर्चा होणार आहे. अजूनही सहा ते सात जागांवर पेच आहे. त्यावर लवकर निर्णय होईल. अमरावतीमध्ये नवनीत राणा की आणखी कुणी, या प्रश्नावर बावनकुळे यांनी सावध उत्तर दिले. भाजपमध्ये कोण प्रवेश करणार हे सध्यातरी निश्चित नाही. पण येथे सर्वांची मदत घेऊ. प्रतिष्ठेप्रमाणे सर्वांना तिकीट दिले जातील. सर्वांचा सन्मान ठेवण्यात येईल.
राजकारण करताना काही मतभेद होत असतात. बच्चू कडू किंवा आनंदराव अडसूळ यांच्यात मतभेद झालेही असतील. मात्र देशात नरेंद्र मोदी प्रधानमंत्री व्हावे, यासाठी बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्यासह सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू महायुतीसोबत राहतील. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत असल्याचे त्यांनी फेटाळले. संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली, त्यावर संजय राऊतांसारख्या लोकांना जनता धडा शिकवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका त्यांनी केली. त्यांना जनता मतांतून उत्तर देईल, असे बावनकुळे म्हणाले.