Anup Dhotre : शेतकरी सध्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याची गरज आहे. कर्ज आणि व्याजाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यासाठी सरकारने कर्ज आणि व्याज पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. लोकसभेत गुरुवारी (ता. 25) धोत्रे यांनी या मुद्द्यावर निवेदन केले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी त्यांना बोलण्याची संधी दिल्यानंतर धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा सभागृहात मांडल्या.
उद्योग क्षेत्राला ‘कॅश क्रेडिट’ स्वरूपात कर्जपुरवठा केला जातो. शेतकऱ्यांना याच स्वरुपात कर्जपुरवठा उपलब्ध करून दिल्यास ते आर्थिक अडचणीच्या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकतील, असा विश्वास अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला. कर्ज, किमान आधारभूत मूल्य, बाजारातील किंमत, कर्जावरील व्याज हे सगळे मुद्दे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आहेत. अशात त्यांना उद्योगांच्या धर्तीवर ‘कॅश क्रेडिट’ स्वरूपात कर्ज मिळाल्यास ही मोठी मदत होऊ शकते. सध्या उद्योगांनाच अशा स्वरूपाचे कर्ज मिळते. मात्र सरकार शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्ज पद्धतीत बदल करू शकते, अशी विनंतीही त्यांनी केली.
दोघांनाही फायदा
धोत्रे यांनी कर्जाच्या मुद्द्यावरील मध्य मार्ग लोकसभेत सांगितला आहे. ‘कॅश क्रेडिट’ स्वरूपात कर्ज मिळाल्यास त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. याशिवया एमएसपीसाठी सरकारला 1 लाख 70 हजार कोटी रुपये टाकावे लागतात. कर्ज पद्धतीवर विचार करून त्यात बदल झाल्यास सरकारच्या या रकमेत देखील बरेच परिवर्तन होऊ शकते, असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांसाठी मोलाचे कार्य करीत आहे. अशात कर्जपुरवठा पद्धतीत काही बदल केले तर त्याला सरकार आणि शेतकरी दोघांनाही लाभ होईल. शेतकरी सुखी झाला पाहिजे, हेच सरकारचे ध्येय असल्याचेही अनुप धोत्रे म्हणाले.
लोकसभेत निवेदन केल्यानंतर अनुप धोत्रे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मोदी सरकार शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या हितासाठी काम करीत आहे. देशाची अर्थव्यवस्था शेती आणि शेतकरी यांच्यावर आधारित आहे. आपण स्वत: देखील कृषी क्षेत्राशी जोडलेले आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना आपल्याला माहिती आहेत. केवळ समस्या सांगत बसण्यापेक्षा समस्या आणि त्यावरील उपाय हे दोन्ही प्रत्येकाने सांगणे अधिक संयुक्तिक ठरते. त्यामुळे कर्जाच्या मुद्द्यावरही उपाय सांगत आपण तसाच प्रयत्न केला आहे. आपल्या एका निवेदनामुळे जर लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला, तर खासदार म्हणून मी माझे कर्तव्या पार पाडू शकलो, याचे समाधान वाटेल असे धोत्रे म्हणाले.