महाराष्ट्र

Lohit Matani : मतानी बॅक टू नागपूर!

Nagpur : उपराजधानीला मिळाले तीन नवीन पोलीस उपायुक्त

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भंडाऱ्यातून मुंबईला गेलेले लोहित मतानी नागपुरात परतले आहेत. नागपुरात त्यांच्याकडे उपायुक्त पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्यासोबत नागपूरला एकूण तीन उपायुक्त मिळाले आहेत. गृहविभागाने गुरुवारी (5 सप्टेंबर) आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीची यादी जाहीर केली. 2020 च्या बॅचमधील महक स्वामी तसेच निथीपुडी रश्मिता राव यांची नागपुरात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे. 

मतानी यांना नागपुरात काम करण्याचा अनुभव आहे. नागपुरातूनच त्यांची भंडारा येथे अधीक्षक बदली झाली होती. तेथून त्यांची 22 ऑगस्ट रोजी मुंबईत सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून बदली झाली. केवळ दोन आठवड्यातच त्यांचे कार्यक्षेत्र पुन्हा बदलण्यात आले आहे. नागपुरातील उपायुक्त निमित गोयल यांच्यावर बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय विदर्भालादेखील नवीन दमाचे अधिकारी मिळाले आहेत. सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी यांच्याकडे गडचिरोली अपर पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

2019 च्या बॅचचे सुशांत सिंह यांची भारत राखीव बटालियन-5 अकोला येथील समादेशक म्हणून बदली झाली आहे. नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य लक्ष्मीकांत पाटील यांच्याकडे मुंबईत सायबर सुरक्षा पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच 2021 च्या बॅचचे दीपक अग्रवाल यांना नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी, शुभम कुमार यांना अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी, वृष्टी जैन यांना उमरेड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

राहून गेलेले काम मतानी पूर्ण करणार

आयपीएस ऑफिसर रोहित मतानी यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर नागपूरकरांच्या मनात ठसा उमटवला. आता ते पुन्हा एकदा नागपुरात आले आहे. त्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले. भंडाऱ्यात तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांना सक्षम बनवण्याचे कार्य मतांनी यांनी केले आहे. तेच कार्य नागपुरात करतील असे बोलले जात आहे.

निवडणुकीची पार्श्वभूमी

निवडणुका आल्या की अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक सरकारने ही परंपरा कायम ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांसह आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. आता विधानसभा निवडणूक जवळ येताच पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांचा सत्ताधारी पक्षाला कसा फायदा होतो आणि विरोधकांचे कसे नुकसान होत असते, हा मात्र कायम संशोधनाचा विषय राहिलेला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!