Students In Danger : राज्यात शालेय पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा दिल्या जात असल्याचा प्रकार वारंवार समोर आला आहे. अनेकदा पोषण आहारात अळ्या, उंदीर, झुरळ आढळले आहेत. तरीही प्रशासन, सरकारला गांभीर्य नसल्याचं समोर आलं आहे. आता पुन्हा असाच एक प्रकार अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील तळेगाव डवला या गावात घडला आहे. पोषण आहार बनविण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यात मृत पाल आढळली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सुदैवाने आहारात मसाला टाकत असताना हा प्रकार लक्षात आल्याने अनर्थ टळला.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पोषण आहार दिला जातो. मुलांना या पोषण आहाराचे वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सशक्त राहण्यासाठी शासनस्तरावर प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे वाटप केले जाते. हाच पोषण आहार आता चिमुकल्यांच्या जीवावर उठत असल्याचे दिसत आहे. त्यामागील कारण म्हणजे पुन्हा एकदा पोषण आहारात मृत पाल आढळली आहे.
अनेक घटना
यापूर्वीही पोषण आहारात असे प्रकार आढळले आहेत. तरीही हे प्रकार थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण आहे. त्यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ चालू असल्याचा हे प्रकार कधी थांबतील असा प्रश्न आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव डवला या गावातील मसाल्यात ही मृत पाल होती. शाळेत पोषण आहार तयार करताना हा प्रकार लक्षात आला. सुदैवाने आहार शिजण्यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला. त्यामुळे अनर्थ टळला. तेल्हारा गटशिक्षण अधिकाऱ्यांनी मसाल्याचं हे पॅकेट सिल केलं आहे. सील केलेले मसाल्याचे पाकिट पुढील तपासणीसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आलं आहे.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार आहे. यासभेत जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी पोषण आहाराच्या मसाल्यात मृत पाल आढळल्याचा प्रकार सभागृहात उपस्थित केला. तत्काळ शालेय पोषण आहार थांबविण्यात यावा, अशी मागणी गव्हाणकरांनी सभागृहात केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. शालेय पोषण आहाराचा मसाला पुरवठा करणाऱ्याला ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात येणार असल्याचा अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहात दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात पोषण आहार आणि त्यातील मृत पालीचा मुद्दा गाजणार आहे. या प्रकरणात आता प्रशासन कोणती कारवाई करणार, याची प्रतीक्षा आहे.