महाराष्ट्र

Assembly Elections : शिंदे गटाने यदीच जाहीर केली!

Shiv Sena : विधानसभेसाठी कंबर कसली; 113 विधानसभा क्षेत्रात प्रभारी, निरीक्षकांची नियुक्ती

विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना शिंदे गटाने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यातील ११३ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रभारी आणि निरीक्षकांची यादीच शिंदे गटाने जाहीर केली आहे. शिवसेनेच्या (शिंदेगट) या निर्णयामुळे निवडणुकीत किमान १०० जागा लढविण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यादृष्टीने भाजप आणि अजितपवार गटासाठी हे मोठे संकेत समजले जात आहे.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला काँग्रेस पक्ष राज्यातील जवळपास सर्वच मतदारसंघावर लक्ष केंद्रित करीत आहे. अश्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गटानेही कंबर कसली आहे. राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघांमध्ये 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. यासोबतच शिवसेना विधानसभा निवडणुकीत 288 पैकी किमान 100 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचा संदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी मित्रपक्षांना दिला.

नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपला तर मोठा फटका बसला. आता राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून प्राथमिक बोलणी सुरू आहे. वेगवेगळ्या जागांवर दावा केला जात आहे. महायुतीतील भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे.

भाजपने विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रावर फोकस केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी नुकताच आढावाही घेतला. तिन्ही पक्षांमध्ये भाजप जास्त जागा लढविण्याची तयारी करीत आहे. अश्यात आता शिवसेना शिंदे गटाने राज्यातील किमान 100 जागा लढण्याची तयारी केली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर झालेली नाही, मात्र जागावाटपावरुन सर्वच पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सक्रिय झाले आहेत. त्यांचे नेते व पदाधिकारी जोरदार तयारीला लागले आहेत. त्याची प्रचिती शिंदे गटाने जाहीर केलेल्या यादीवरून येते. या यादीमध्ये बहुतांश मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यात दीपक केसरकर, उदय सामंत, भावना गवळी, संजय राठोड, कृपाल तुमाने आदींचा समावेश आहे.

113 मतदारसंघांवर नजर!

राज्यातील 113 मतदारसंघांची पक्षातील नेत्यांना जबाबदारी दिली आहे. शिवसेनेना शिंदे गटाने 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली. त्यामुळे यातून आपला सहकारी असलेला भाजपला एक प्रकारे संदेश दिला असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीत गाफील राहू नका, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या नेत्यांना सांगितल्याचे कळते. त्याचदृष्टीने शिंदे यांनी नेत्यांची फौज तयारीसाठी उतरवली आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी बोलताना नारायण राणे यांनी भाजपने सर्व 288 जागा लढाव्या, असं वक्तव्य केलं होतं. या विधानाचाच हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंचा फोकस मुंबईपासून विदर्भापर्यंत!

शिवसेना शिंदे गटाने राज्यातील 288 मतदारसंघापैकी ज्या 113 विधानसभा मतदारसंघावर फोकस केला आहे. त्यामध्ये मुंबईपासून तर विदर्भातील अनेक जागांचा समावेश आहे. ज्या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे, अशा मतदारसंघासाठी शिंदे गट आग्रही आहे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना विरुद्ध महायुतीतील शिंदेंची शिवसेना असा जोरदार सामना रंगण्याची शक्यता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!