संपादकीय

Liquor Scam : ‘दारू बुरी बला हैं.. एक जाम तुम खतम करो.. एक हम खतम करें..’

Chandrapur To Delhi : सर्वत्र चर्चा मद्यपुराणाचीच  

Income Politics : गोष्टींच्या अनेक पुस्तकांमध्ये तुम्ही एका आटपाट नगराचा उल्लेख ऐकला असेल. आज आपण अशाच एका आटपाट नगराबद्दल चर्चा करणार आहोत. दूरदेशी एक आटपाट नगर होते. या नगरातील प्रजा आनंदी होती. सर्वत्र सुजलाम, सुफलाम वातावरण होते. घरातील कर्ते पुरुष काम आटोपल्यानंतर थेट घरी यायचे. आपले सर्व उत्पन्न घरातील गृहलक्ष्मीच्या हाती द्यायचे. या नगरातील गृहलक्ष्मी सुखी आणि समाधानी होत्या. मुले आनंदित होती. सगळ्यांकडे शांती आणि समृद्धी होती.

अशातच या आटपाट नगरामध्ये मद्यप्रवृत्तीचा प्रवेश झाला. नगरातील प्रजेला सुखी व आनंदी पाहून या प्रवृत्तीला पोटशुळ उठले. त्यामुळे आटपाट नगरावर आपली काळी छाया पसरविण्याचा चंग त्यांनी बांधला. नगरातील लोकांची बुद्धी भ्रष्ट करण्यासाठी या प्रवृत्तीने विक्रेत्याचे रूप घेतले. त्यानंतर हे दैत्य नगरातील लोकांमध्ये एक पेय वाटू लागले. हे पेय पिल्यावर नगरातील लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली. नगरवासी इतक्या वाम मार्गाला गेले की, ही सुखी-समाधानी आटपाट नगर बघता-बघता उजाड झाले. मद्यप्रवृत्तीने तयार केलेल्या या पेयाला त्या काळात मंदिरा आणि आजच्या आधुनिक काळात मद्य म्हणून ओळखले जाते.

मदिरेचा अंमल चढल्यानंतर दैत्यच नव्हे तर देवराज इंद्रही अनेकदा अहंकारी झाले. त्याचमुळे अनेकदा देवराज इंद्राला स्वर्गही गमवावा लागला. असाच सत्तेचा स्वर्ग अलिकडेच तेव्हाची ‘इंद्रपुरी’ आणि आताची दिल्ली अशी ओळख असलेल्या राज्याच्या राजालाही सोडून काही काळ कोठडीत जावे लागले. अरविंद केजरीवाल हे त्या इंद्रपुरीच्या राजाचे नाव. अर्थातच या जेलवारीसाठी केजरीवाल आणि त्यांच्या समर्थकांनी विरोधकांना जबाबदार ठरवले. पण पुन्हा एकदा हे सिद्ध झाले की, अशा प्रकारचे महाभारत केवळ दोनच कारणांमुळे होऊ शकते. बाटली हे त्यातील एक कारण.

गल्ली ते दिल्ली चर्चा..

बाटलीची चर्चा देशात प्रथमच होत आहे असे नाही. देशात कोविड महासाथ पसरली होती. लोकांचे पटापट जीव जात होते. महाराष्ट्रातील लोक घराचा उंबराठाही ओलांडून बाहेर पडायला घाबरत होते. मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा सर्व बंद होते. रुग्णालय आणि औषधालय सोडले तर सगळे बंद होते. अशात महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडीला एकच चुळचुळ मुंग्या सुटल्या होत्या. त्या म्हणजे मद्यालय सुरू करण्याच्या. देवालय, रुग्णालय बंद, पण मद्यालय सुरू, अशी तेव्हाची परिस्थिती होती. अगदी प्रत्येक मद्यालयासमोर पोलिस बंदोबस्त लावून तेव्हाच्या सरकारने होत्या, नव्हत्या तेवढ्या सगळ्या बाटल्या खपविल्या. अशा कृत्यांमुळे सरकार चांगलेच नशेत आले. इतके नशेत की मखमली राज सिंहासन केव्हा गेले हे कळलेही नाही.

राज्यातील दारू दुकाने उघडणाऱ्या सरकारने महाराष्ट्रात आणखी एक प्रताप आपल्या नावे केला. विदर्भातील वर्धा, गडचिरोलीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली होती. चंद्रपूर विदर्भातील सगळ्यात मोठे उद्योग केंद्र. देशभरातील श्रमिक येथे वास्तव्यास आहेत. दिवसभराचा थकवा घालविण्याच्या नावाखाली येथील अनेक जण रोज मद्याचा घोट घ्यायचे. त्यातून कौटुंबिक हिंसाचार, महिलांवर अत्याचार असे प्रकार वाढले. हे प्रकार थांबविण्यासाठी चंद्रपुरात दारूबंदी झाली. त्यासाठी या जिल्ह्यात देशातील सगळ्यात मोठा दारूबंदी लढा झाला. आंदोलने झाली. या लढ्याला यश आले आणि बाटली आडवी झाली. पण आटपाट नगरात पुन्हा प्रवेश केलेल्या ‘त्या’ प्रवृत्तीने पूर्ण गाव बरबाद केले, कसे कोण जाणे चंद्रपुरात ते पोहोचले. संधी साधत त्यांनी पुन्हा बाटली उभी केलीच. बाटली उभी होताच आटपाट नगरात जशा घराघरातून माता-भगिनींच्या किंचाळण्याचे आवाज यायचे तसेच आवाज पुन्हा चंद्रपुरातून ऐकू येऊ लागले.

Lok Sabha Voting : दोन्ही मतदारसंघातील 3584 मतदान केंद्रांवर होता ‘वॉच’

चलो खतम करो कहानी..

कोणतीही बोधकथा ऐकल्यावर कथा सांगणाऱ्याचे एक वाक्य पेटंट असते. ‘हं.. तर मुलांनो.. या कथेतून आपण काय शिकलो?’ हे ते वाक्य. आतापर्यंत येथे जी कथा आपण सर्वांनी वाचली त्यातून आपल्याला काय बोध होतो? बोध हाच होतो की आटपाट नगर असो किंवा इंद्राचा स्वर्ग, महाराष्ट्रातील चंद्रपूर असो की देशाची राजधानी दिल्ली ‘सारे फसाद की जड दारू हैं..’ खरोखर सांगतो ‘दारू बुरी बला हैं..तो फिर आओ ईस बला को खतम करें.. एक जाम तुम खतम करो.. एक जाम हम खतम करें..’ आता हा जाम कसा खतम करायचा, हे ज्याने त्याने आपआपले ठरवावे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!