Akola : जून महिन्यापासून अकोलाकरांची पावसासाठी असलेली प्रतीक्षा अखेर संपली. अकोल्यात पावसाला सुरूवात होताच शेतकरी बांधवांच्या डोळ्यात आशेचे पाणी आणि चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. मात्र हे चित्र फार काळ राहू शकले नाही. पावसाच्या प्रतीक्षेने व्याकुळ शेती चिंब भिजली मात्र शेतकरी राजाचे जनजीवनच विस्कळीत झाले.
अकोल्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलीच दाणादाण उडविली. अनेक घरात पाणी शिरले, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. दुसरीकडे मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने अकोल्यातून अधिवेशनासाठी मुंबईला जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही याचा फटका बसला. स्थानिक आमदार रणधीर सावरकर यांनी तत्परता दाखवत प्रशासनाला आवश्यक निर्देश दिले.
जून महिना संपूनही जिल्ह्यात पाऊस न आल्याने कोरड्या दुष्काळाचे सावट होते. हवामान विभागाचे सर्वच अंदाज चुकीचे ठरले. अखेर 7 जुलै पासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. रात्रीपासून सोमवारी दुपारपर्यंत मुसळधार पाऊस सर्वत्र बरसला. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. तर दुसरीकडे आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र शहरातील नाले सफाईची पावसाने पोलखोल केली.
शहरातील मुख्य रस्त्यावरून नालीचे घाण पाणी वाहत होते. महापालिका प्रशासनाचे ढिसाळ नियोजन अकोलेकरांना त्रासदायक ठरले.
सावरकरांनी घेतली विधानसभेतून दखल
संततधार पावसामुळे अकोट राज्य महामार्गावरील चोहट्टा बाजार शहानूर नदी जवळच्या मुख्य रस्त्याच्या बाजूचा भराव खचले. मुंबई येथे विधिमंडळ पावसाळी अधिवशनासाठी गेलेल्या आमदार रणधीर सावरकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. त्यांच्या निर्देशानंतर सबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भरावाच्या दुरस्तीच्या कामास सुरुवात केली. नागरिकांना कुठल्याही त्रासाला सामोरे जावे लागू नये, याची दक्षता आमदार सावरकर यांनी घेतल्याने जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
पुरात अडकलेल्यांचे बचावकार्य
अकोला तालुक्यातील खरप येथे पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजूरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. रस्त्याचे काम सुरु असताना जवळच असलेल्या बन्सी नाल्याला अचानक मोठा पूर आला. पुराच्या पाण्यामुळे जेसीबीचे चालक राम पटेल, विक्रम सिंग तसेच मजूर संजय बागूल, सोमन दिवे, विजय पवार, करण कसबेकर, मुन्ना चितकार, जयसिंग चतुर, गोलु धायकर हे आज अडकले होते. माहिती मिळताच शोध व बचाव पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढले. जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथे अतिवृष्टीने भिंत कोसळून एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर 83 घरांचे नुकसान झाले.
संतप्तांनी रोखलेला रस्ता रुग्णवाहिकेसाठी मोकळा केला
शहरातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात नालीतील पाणी शिरल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर रास्ता रोको आंदोलन केले. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला आहे. जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत तोपर्यंत रास्ता रोको करू, असा इशारा नागरिकांनी दिला. यावेळी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक खोळंबली होती.
वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या, परंतु यावेळी संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला आहे.