Delhi Police : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्र्यांचा शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनात 10 जून रोजी पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींसह त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याची जेवढी चर्चा देशभर आहे. तेवढीच चर्चा आता शपथविधी सोहळ्यातील एका व्हिडिओ क्लिपची होत आहे. मंत्र्याच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रपती भवनात एक अजब प्राणी कॅमेऱ्यात कैद झाला.
या रहस्यमय प्राण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान स्टेजच्या मागे एक गूढ प्राणी दिसल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, आता दिल्ली पोलिसांनी याबाबत अधिकृत वक्तव्य करत अशा बातम्यांचे खंडन केले आहे.
अफवांना बळी पडू नये
शपथविधी सोहळ्यात आढळलेला तो प्राणी बिबट्या होता का? असे लोक म्हणत आहेत. याला नकार देत दिल्ली पोलिसांनी एक्सवर पोस्टमध्ये लिहिले की, “काही मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल 10 जून रोजी राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रसारणादरम्यान घेतलेल्या एका प्राण्याचे छायाचित्र दाखवत आहेत. तो बिबट्या असल्याचा दावा करत आहेत. हे तथ्य खरे नाही, कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी सामान्य घरातील मांजर आहे. कृपया अशा फालतू अफवांना अजिबात पसरवू नका.
काय होता प्रकार
शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूण 72 मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान यावेळी मंत्र्यांच्या शपथविधी दरम्यान मागे एक प्राणी फिरताना कॅमेरात कैद झाला आहे. हा गूढ प्राणी अत्यंत सहजपणे फिरत होता. पण चित्र स्पष्ट नसल्याने तो नेमका कोणता प्राणी होता या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाचे नवनिर्वाचित खासदार दुर्गा दास यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद आणि गोपनीयतेची शपथ देत होत्या. यावेळी शपथ पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सही केली. त्यानंतर ते अभिवादन करण्यासाठी उठले असता मागे एक प्राणी चालताना दिसत आहे
सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे नेटकरी वेगवेगळ्या शंका उपस्थित करत होते. तो बिबट्या होता की मांजर? किंवा कुत्रा होता? अशा शंका नेटकरी मांडत होते. मात्र याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे.