महाराष्ट्र

Ramesh Chennithala : बंडखोरांची आता पक्षातून हकालपट्टी!

Buldhana : काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांची घोषणा; विधान परिषदेतील दगाबाजीचे पडसाद

आतापर्यंत पक्षात जे झाले ते झाले. आता मात्र पक्षविरोधी कारवाया करणारे नेते, बंडखोर आणि पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमधून थेट हकालपट्टी करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली. बुलढाण्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना बंडखोरांचे आता काही खरे नाही, असे स्पष्ट केले.

बुलढाणा येथे मंगळवारी hmr(दि.१३) बुलढाणा, अकोला आणि वाशीम या जिल्ह्यांची विधानसभापूर्व तयारीसाठी संयुक्त बैठक पार पडली. बुलढाणा अर्बन कृत सहकार विद्या मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात झालेल्या या बैठकीमध्ये चेन्नीथला बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात, विरोधीपक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार, विधानपरिषद गटनेते सतेज पाटील या दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘आता पक्षात बेशिस्त आणि बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही. आगामी काळात आणि विधानसभा निवडणुकीत बंडखोरी आणि पक्षविरोधी कारवाया करणारे नेते आणि पदाधिकारी यांना थेट पक्षातून काढून टाकले जाईल. उमेदवारीसाठी टोकाची स्पर्धा आहे. एकेका मतदारसंघातून अनेकांनी जिल्हा वा राज्य काँग्रेस समितीकडे अर्ज दाखल केले आहेत. मात्र, ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम इतरांनी प्रामाणिकपणे करावे. यात कुठल्याही प्रकारचे हेवेदावे सहन केले जाणार नाही,’ असा दम चेन्नीथला यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिला.

बुलढाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांच्या संयुक्त बैठकीत मोजक्या नेत्यांनी मार्गदर्शन केले. दुपारी जिल्हानिहाय स्वतंत्र बैठका घेण्यात आल्या. प्रथम वाशीम, संध्याकाळी अकोला, अंतिम सत्रात बुलढाणा जिल्हा काँग्रेस समितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकांत जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय काँग्रेसची स्थिती, अपेक्षित जागा, लोकसभा निवडणुकीमधील स्थिती, इच्छुक उमेदवारांची संख्या, संघटन, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कामगिरी याचा तपशीलवार आढावा घेण्यात आला.

इच्छुकांच्या समर्थकांची गर्दी

बैठकीला जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे, राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश समितीचे पदाधिकारी श्याम उमाळकर, संजय राठोड, जयश्री शेळके, आमदार राजेश एकडे, धीरज लिंगाडे, अमित झनक, माजी आमदार दिलीप सानंदा हजर होते. संयुक्त बैठकीमुळे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी सभागृह तुडुंब भरले होते. यावेळी थोरात, वडेट्टीवार, सतेज पाटील, लिंगाडे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी बैठकीची पार्श्वभूमी, उद्देश विशद केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!