Maharashtra : बुथ लेव्हलपासून प्रत्येक गोष्टीत अतिशय बारकाईने काम केल्याचा दावा भाजपने केला. अमित शाह यांनी दिलेला मंत्र अंमलात आणला. पण, तरीही ऐन निवडणुकीच्याच वेळी सगळा गोंधळ झाला. उमेदवार जाहीर होताच राजी-नाराजीचे नाट्य सुरू झाले. कुणी आनंदित झाले, तर कुणाला अतीव दुःख झालं. कुणी बंडखोरी करण्यावर उतरले तर कुणी थेट भूमिका घेऊन काम करणार नाही असे बजावून सांगितले. पण, यातून भाजपच्या बांधणीला मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीचे नेते पक्षांमधील बंडखोरीमुळे हैराण झाले आहेत. तिकीट वाटपानंतर बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपने तर विशेष तयारी केली होती. विशेषत: राज्यपातळीवर समितीदेखील गठीत करण्यात आली होती. मात्र तरीदेखील बंडखोरी झाल्याने भाजपच्या बांधणीलाच हा धक्का मानण्यात येत आहे. भाजपने आता बंडखोरांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र खरोखरच अशी कारवाई करता येणे वास्तवात शक्य आहे का हा सवाल उपस्थित होत आहे.
बंडखोरांची दादागिरी
जर बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकतो. ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तिकीट न मिळाल्यानंतरदेखील उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यांनी त्यांच्या भावना यातून व्यक्त केल्या आहेत. निवडणूक संचालन समितीने अशा पदाधिकाऱ्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे अर्ज मागे घेतले जातील असा विश्वास आहे. मात्र, जे अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असे बावनकुळे यांनी सांगितले.
बावनकुळे यांचा इशारा
मात्र पक्षाने अगोदरपासूनच संभाव्य बंडखोरांशी संपर्क साधला होता. परंतु समितीचे न ऐकता अनेक जणांनी अपक्ष अर्ज भरले. तर काही नवीन बंडखोरदेखील समोर आले. हा प्रकार भाजपसाठी अनपेक्षित होता.
विशेष म्हणजे काही बंडखोर हे त्या त्या मतदारसंघात प्रभावी असून भाजपची मदार त्यांच्या सहभागावर अवलंबून आहे. जर त्यांच्यावरच कारवाई केली तर भाजपने कुऱ्हाडीवर पाय मारण्यासारखेच ते ठरणार आहे. त्यामुळेच बावनकुळे यांचा इशारा कितपत गंभीर आहे असा सवाल उपस्थित होत आहे.