Nanded : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या (23 डिसेंबर) सोमवारी परभणीच्या दौ-यावर आहेत. या दौ-यात राहुल गांधी सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. 12.30 वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल. नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील.दुपारी 2.15 ते 3.15 या वेळात ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतील. त्यानंतर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत.
या दोन कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी नांदेडकडे प्रयाण करतील व संध्याकाळी 5.15 वाजता विमानाने दिल्लीला जातील. यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख, खासदार रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. कल्याण काळे, डॉ. शिवाजी काळगे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश वरपुडकर, एस. सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
विटंबना
परभणीत संविधानाची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत लोकांना अमानुष मारहाण केली. निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. सोमनाथ सुर्यवंशी या तरुणालाही अटक केली होती. त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणात शांतता प्रस्थापित करत असताना विजय वाकोडे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याचा ह्लदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. या सर्व गोष्टींची दखल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतली. पिडितांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी ते चर्चा करणार आहेत.
Winter session : CAGचा रिपोर्ट मुद्दामहून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडला !
धक्कादायक
परभणीत जे घडले, ते देशासाठी धक्कादायक आहे. कोबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांनी अक्षरशः मारापीटी केल्याचा आरोप केला जात आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या घरांत घुसून त्यांच्या बायका मुलांना मारहाण करण्यात आली. देशभर या घटनेचा निषेध केला गेला. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. पिडितांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर येत आहेत.