Lok Sabha Election : मुंबईतील सहा, महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात सोमवारी 20 मे रोजी मतदान होत आहे. 2.46 कोटीहून अधिक लोक मतदान करण्यास पात्र आहेत आणि 264 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. 24,553 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
मतदारसंघांची नावे
या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर – पूर्व, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे.
यांच्या भाग्याचा फैसला
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (मुंबई उत्तर), भारती पवार (दिंडोरी) आणि कपिल पाटील (भिवंडी) हे भाजपच्या प्रमुख उमेदवारांपैकी आहेत. भाजपाने (महायुती) मुंबई उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेचे श्रीकांत शिंदे (कल्याण) आणि शहर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड (मुंबई उत्तर मध्य) रिंगणात आहेत.
महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (तुतारी) या विरोधी आघाडीची महायुती विरोधात मुख्य लढत आहे. पाचव्या टप्प्यातील 13 जागांपैकी 10 जागा मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पश्चिम आणि मुंबई दक्षिण मध्य या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपने मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर-पूर्वमध्ये उमेदवार उभे केले आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर-पूर्व आणि मुंबई उत्तर-पश्चिम येथे महाविकास आघाडी भागीदार राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेससोबत जागावाटप कराराचा एक भाग म्हणून उमेदवार उभे केले आहेत. मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तरमध्ये काँग्रेसचे उमेदवार रिंगणात आहेत.
ठाणे, कल्याण येथील लढत
ठाणे आणि कल्याण, जिथे प्रतिस्पर्धी सेना एकमेकांच्या विरोधात आहेत. ही लढाई मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय नरेश म्हस्के आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे अनुक्रमे ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेचे उमेदवार आहेत. पालघरमध्ये भाजप आणि सेना (उबाठा) यांच्यात लढत आहे. तर भिवंडीच्या कापड उत्पादन केंद्रात भाजप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) प्रमुख दावेदार आहेत.
मतदारसंघ धुळे
धुळ्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आहे. दिंडोरीमध्ये भाजप विरुद्ध शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) असा सामना आहे. तर नाशिकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) आमने सामने आहेत.
प्रशासनाची दक्षता
शहरात मतदान सुरळीत पार पडावे यासाठी मुंबईत जवळपास 30,000 सुरक्षा कर्मचारी तैनात राहणार आहेत. दंगल नियंत्रण पोलिसांच्या तीन तुकड्यांसह किमान 2,752 अधिकारी आणि 27,460 इतर कर्मचारी महानगरात निवडणुकीच्या दिवशी बंदोबस्तावर तैनात असतील.
अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाचे पाच अधिकारी, 25 पोलिस उपायुक्त (डीसीपी) आणि 77 सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) बंदोबस्ता दरम्यान विविध पथकांचे नेतृत्व करणार आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मतदानाच्या दिवशी जवळपास 5,000 पोलिस, 6,200 होमगार्ड आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (सीएपीएफ) 36 तुकड्याही बाहेरून आणल्या जाणार आहेत.