Akola Costituncy : 35 वर्षे झालीत अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा खासदार निवडून येऊ शकलेला नाही. काँग्रेसचा अनुकूल काळ होता तेव्हा अकोल्यात कै. वसंतराव साठे, वाशिमला गुलाम नबी आझाद या बाहेरच्या नेत्यांना मतदारांनी स्वीकारले. परंतु काळ बदलला. एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जाणारा अकोला मतदारसंघ भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात गेला. 1989 ते 2024 या टप्प्यात 1998,99 चा अपवाद वगळता भाजपचा खासदार राहिला. दोन टर्म अॅड. प्रकाश आंबेडकर खासदार होते. त्यावेळी काँग्रेसची साथ त्यांना मिळाली होती. यावेळी महा विकास आघाडीने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाचे अनुप धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी मुख्य लढत आहे.
1984-89 कै. नानासाहेब वैराळे अकोल्याचे खासदार होते. दरम्यान, मंडल, कमंडलचे राजकारण देशात घोंगावत होते. राम जन्मभूमी आंदोलनाने देश ढवळून निघाला. हिंदुत्ववादी विचार आणि त्याला विरोध करणारा वर्ग असे धृवीकरण झाले. भाजप मित्र पक्षांना त्या परिस्थितीचा फायदा झाला. अकोला येथे 1989 च्या निवडणुकीत कै. पांडुरंग फुंडकर निवडून आले. भाऊसाहेब फुंडकर यांचे कार्यक्षेत्र खामगाव होते. परंतु खामगाव तेव्हा अकोला लोकसभा मतदारसंघात येत असल्याने तेही भाऊसाहेबांसाठी अनुकूल ठरले. सतत तीन वेळा भाऊसाहेब खासदार होते. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि 2004 च्या निवडणुकीत भाजपने संजय धोत्रे यांना उमेदवारी दिली. धोत्रे यांनी 2004, 2009, 2014 आणि 2019 ची निवडणूक जिंकली. शेवटच्या टर्म मध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे धोत्रे यांना राजीनामा द्यावा लागला. एव्हाना नव्याने लोकसभा निवडणूक जाहीर झाली. संजय धोत्रे यांच्या जागी त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली.
गेली चार दशके प्रकाश आंबेडकर हे ही या मतदारसंघात लढत आहेत. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नातू म्हणून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तसेच अकोला पॅटर्नच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग त्यांनी केला. त्यातून जिल्हा परिषद तसेच विधानसभेतही भारिपचे सदस्य पोहचू शकले.
कोंडी फोडण्यात डॉ. पाटील यशस्वी ठरतील ?
या निवडणुकीत समीकरणे बदलली आहेत. जुन्याची जागा नवीन मित्रांनी घेतली. यावेळी महा विकास आघाडीने डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील आणि धोत्रे पहिल्यांदा लढत आहेत. त्यांचा सामना मुरब्बी राजकारणी प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत होत आहे. त्यामुळे तिरंगी लढत चुरशीची होणार आहे. परंतु यक्षप्रश्न विचारला जातो तो हा की यावेळी तरी डॉ. अभय पाटील काँग्रेसला अच्छे दिन आणण्यात यशस्वी ठरतात का?