Shiv Sena : निवडणुकीत उभे राहताना सर्वच उम्मेदवारांनी आपल्या मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात दिली आहे. यामध्ये बहुतांशी उमेदवार हे कोट्याधीश आहेत. असे असले तरी निवडणून येणारे आमदार हे मतदानात मात्र लाखोपती झाल्याचे दिसून आले. बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका नुकतेच पार पडल्या. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर झाला असून जिल्ह्याचे 7 नूतन आमदार ठरले आहे. यंदाच्या निवडणुकीत तब्बल सहा उमेदवारांनी 1 लाखावर मते घेतली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे हे ठळक वैशिष्ट्य ठरले आहे. यातील पाच ‘लखपती’ आमदार झाले तर लाखांवर मतदान घेऊनही एक दुर्देवी उमेदवार पराभूत झाला आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे जिल्हा अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी 1 लाख 6 हजार 11 मते घेतली. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याचे कारण त्यांच्या प्रतिस्पर्धी आमदार श्वेता महाले या 1 लाख 9 हजार 212 मते घेत जास्त लोकप्रिय ठरल्याने विजयी झाल्या. यंदाच्या लढतीतील भाजपचे चारही उमेदवार विजयी ठरले आणि त्या चौघांनी लाखावर मते घेतली हे विशेष! आमदार श्वेता महाले यांच्यासह भाजपच्या चारही उमेदवारांनी लाख पेक्षा जास्त मतदान घेत विजय मिळविले आहे. मलकापूर विधानसभेत चैनसुख संचेती यांनी 1 लाख 9 हजार 921 मते घेत विजयश्री खेचून आणली. मागील 2019 च्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला आहे. मागील लढतीतील प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांचा त्यांनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 26 हजार मतांच्या फरकाने पराभव केला.
सहाव्यांदा आमदार
ते विक्रमी सहाव्यांदा आमदार झाले आहे. खामगाव मध्ये भाजपचे आमदार आकाश फुंडकर यांनी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 10 हजार मतदान घेत तिसऱ्यांदा बाजी मारली. जळगाव जामोद मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार संजय कुटे यांनी सलग पाचव्यांदा आमदारकी मिळविली. त्यांनी 1 लाख 7 हजार 318 मते घेत विजय मिळविला. शिंदे गटाचे संजय गायकवाड हे दुसऱ्यांदा बुलढाण्याचे आमदार झाले. मात्र त्यांना 91 हजार 660 पर्यंतच मजल मारता आली. याचे कारण ठाकरे गटाचा जयश्री शेळके यांनी त्यांना कडवी झुंज देत 90 हजार 810 मताचा टप्पा गाठत 841 मतांनी पराभव स्वीकारला.
सिंदखेडराजा आमदार मनोज कायंदे यांना तिरंगी लढतीमुळे 73913 पर्यंत मजल मारता आली. मात्र माजी मंत्री राजेंद्र शिंगणे आणि शिंदे गटाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर यांचा पराभव करून खऱ्या अर्थाने जायंट किलर ठरले आहे. 30 वर्षानंतर सिंदखेडराजा ला नवीन नेतृत्व लाभले आहे. मात्र या आमदारांना लाखावर मतदान मिळाल्याने ते लखोपती ठरले एवढेच!
ठाकरे गटाचे खरात यांनाही लाखावर मते
शिवसेना ठाकरे गटाचे मेहकर मधील उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी पहिल्याच लढतीत आमदार संजय रायमूलकर याना पराभूत केले. 2009 पासून सलग तीनदा आमदार झालेले संजय रायमूलकर यांना पराभूत करून ते ‘जायंट किलर’ ठरले. आमदार खरात यांनी 104242 मते घेत शिंदे गटाला मोठा दणका दिला. तरीही रायमूलकर यांनी लाखापर्यंत धडक देत 99423 मते घेतली.