प्रशासन

Lakhandur Tehsil : आमदाराचा कार्यकाळ पूर्ण तरी इमारतीचे बांधकाम अपूर्ण

Administrative Building : नव्या इमारतीच्या लोकार्पणाचे सौभग्य मिळणार कुणाला?

Bhandara Politics : भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तहसील कार्यालयाला लागलेली साडेसाती संपता संपेना असे चित्र आहे. या इमारतीच्या कुंडलीत असे कोणते राहू-केतू आडवे येत आहे हे प्रशासनालाही कळेनासे झाले आहे. एखाद्याच्या कुंडलीतील अनिष्ट ग्रह जसे एखाद्याचे काम होऊच देत नाहीत, अगदी त्याच पद्धतीने लाखांदूर तहसील कार्यालयाचे बांधकाम संपता संपेना असे झाले आहे. कासवाच्या गतीलाही लाजवेल इतक्या संथपणे लाखांदूर तहसीलच्या इमारतीचे काम तीन ते चार वर्षांपासून सुरू आहे. 

तहसील कार्यालयाच्या इमारतीकडे पाहिल्यावर अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना केवळ ‘कार्य प्रगती पर है..’ एवढाच काय तो फलक दिसतो. नवीन इमारत मंजूर झाली. पण ती श्रेयवादात अडकली. आजी-माजी आमदार यांच्यात हा श्रेयवाद नेहमीच रंगतो. आपल्याच प्रयत्नातून ही इमारत मंजूर झाल्याचं दोन्ही नेते सांगतात. पण इमारत पूर्ण करून घेण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही.

कर्ताकरविता कोण?

मंजूर झालेली नवीन इमारत आपल्यामुळेच झाली असे सांगत अनेकदा राजकारण होते. मात्र वेगानं इमारतीच्या पूर्णत्वाकडे कोणीही लक्ष दिलं नाही. अशात आता विद्यमान ‘आमदार महोदय’ यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. मात्र लाखांदूर तहसील कार्यालयाच्या इमारती अपूर्णच राहिली. इमारतीच्या लोकार्पणाची फित कापण्याचे सौभाग्य आजी किंवा माजी यापैकी कोणत्याही आमदारच्या ‘शुभ हस्ते’ होऊ शकले नाही. त्यामुळे लाखांदूर तहसील कार्यालयाच्या लोकार्पणाची फित कापण्याचे सौभाग्य आपल्याला मिळेल का, हे आता नवीन आमदाराला एखाद्या चांगला हस्तेरेखा तज्ज्ञाला दाखविण्याची वेळ आली आहे.

एक तहसील कार्यालयाची साधी इमारतही पूर्ण करता येत नसेल तर इतक्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीचा फायदा काय, असा सवाल आता सगळेच नेत्यांना विचारू लागले आहेत. तालुका मुख्यालयही अद्ययावत होत नसेल तर आता काय बोलावं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. साकोली विधानसभा मतदारसंघात साकोली, लाखनी, लाखांदूर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील मतदारांच्यावतीने अपूर्ण तहसील कार्यालय ‘मेरा नंबर कब आएगा’ असा प्रश्न विचारत आहे.

भाऊ, थोडं लक्ष प्लीज

नाना पटोले आमदार असताना 2019 मध्ये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं बांधकाम सुरू झालं. आता पटोले यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. मात्र तरीही लाखांदूर तहसील कार्यालयाच्या ‘पंजा’वरील हस्तेरेषा मळक्याच राहिल्या आहेत. भंडारा जिल्ह्यात पाचही तहसील कार्यालयाच्या नवीन इमारती तयार आहेत. फक्त लाखांदूर कार्यालय वगळता. 2021 ते 2024 पर्यंत हे काम सुरूच आहे.

तहसील कार्यालय उभे झाले म्हणजे झाला का पूर्ण मतदारसंघाचा विकास, असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. पण तहसील कार्यालयात दररोज त्या त्या मतदारसंघातील हजारो नागरिक येत असतात. वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने ते या कार्यालयाचे उंबरठे झिजवत असतात. अशात जीर्ण कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व नागरिक काम करणार तरी कसे असा प्रश्न आहे.

तहसील कार्यालयातील प्रमुख हा तहसीलदार असतो. त्याला तालुका दंडाधिकारी असेही संबोधले जाते. दंडाधिकारी अर्थात तालुक्याचा न्यायाधीशच. तहसीलदाराच्या कोर्टातही वेगवेगळ्या केसेस सुरू असतात. काही जमिनीशी संबंधित तर काही फौजदारी स्वरूपाच्या. पण लाखांदूरच्या तहसील कोर्टात बसणाऱ्या तालुका मॅजिस्ट्रेटची अवस्था सध्या जॉली एलएलबी या चित्रपटातील न्यायाधीश सुंदरलाल त्रिपाठी अर्थात अभिनेता सौरभ शुक्ला यांच्यासाखी झालेली दिसते, जो विचारतो ‘भाई साहब.. ये बदबूदार कमरे.. ये पडी हुई फाइल.. उनपर जमी हुई धूल.. इसे आप कोर्ट कहते है.. ?’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!