महायुती सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताच्या मोठमोठ्या योजनांचा पाऊस पाडला. या योजनांर्तगत सरकारला बहीण लाडकी झाली, भाऊ लाडका झाला. मात्र, अतिवृष्टीने बेजार झालेला शेतकरी कसा परका झाला? लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसेही जमा झाले. आणि लाडक्या भावाचेही लवकरच मिळतील. शेतकरी मात्र अद्याप नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याची प्रतिक्षाच करत आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या धानपिकाचे पंचनामे होऊन दीड ते दोन महिने लोटले. तरीसुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयासुद्धा जमा झाला नाही. शेतकऱ्यांकडे जो पैसा होता तो आधीच त्याने धान शेतीत वापरला आहे. आता शेतकरी नुकसान भरपाईच्या रकमेसाठी आस लावून बसला आहे.
कर्जाचा डोंगर कमी करावा
अतिवृष्टीमुळे संपूर्ण धान शेतीचे नुकसान झाली. आता शेतकऱ्यांचा सर्वांत मोठा सण बैलपोळा आला. तो साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे एकही रुपयाही शिल्लक उरला नाही. मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींच्या खात्यात भरभर पैसे टाकले. त्याच पद्धतीने आम्हा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकावे. म्हणजे बैलपोळा सण साजरा करता येईल. आमच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. त्याचवेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एका एकरामागे पन्नास हजार रुपयांची मदत करून शेतावरील पीककर्जही माफ करावे, अशी विनंती जिल्ह्यातील शेतकरी करीत आहे.
भंडारा जिल्ह्यात 27 जुलैच्या मध्यरात्री व 28 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसला. जिल्ह्यातील सातही तालुके मिळून 99 हजार 996 हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे 23 हजार 260 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली. यात 519 गावांमधील शेतशिवारांचा समावेश आहे. 49 हजार 197 शेतकरी बाधित झाले आहेत. खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, तूर, कापूस व भाजीपाला पिकांची लागवड केली होती. मात्र, 19 ते 29 जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले. यात भंडारा तालुक्यातील 122, मोहाडी 108, तुमसर 6, पवनी 128, साकोली 46, लाखनी 20 तर लाखांदूर तालुक्यातील 89 गावांचे सर्वेक्षण झाले. एकूण 99 हजार 996 हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यापैकी 23 हजार 260 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने जाहीर केली. भंडारा तालुक्यात 2 हजार 619, मोहाडी 4 हजार 181, तुमसर 27 हजार 517, साकोली 504, लाखनी 131 तर लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक 15 हजार 610 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे.