Gondia : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तहसील अंतर्गत कुलारभट्टी, मरमजोब, बिजाकुटुंब आणि डोमाटोला ही आदिवासी बहुल गावं आहेत. ही सर्व गावं आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. आरोग्य, शिक्षण, अखंड रस्ते, शुद्ध पिण्याचे पाणी यासह अनेक सुविधा नाहीत. नागरिकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आदिवासींच्या नावावर येत असलेला करोडो रुपयांचा निधी कुठे गायब होतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विकास कधी
नक्षलवादी, आदिवासी बहुल गावे विकासापासून कोसो दूर असल्याची ओरड सुरु झाली आहे. सालेकसा हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. या तहसीलपासून 25 कि. मी. अंतरावर कुलारभट्टी, मरमजोब, बिजाकुटुंब, डोमाटोला ही गावे आहेत. जिथे आजही व्यवस्थित रस्ता नाही. शुद्ध पिण्याचे पाणी, शिक्षण आणि आरोग्याची सोय नाही. रोजगाराचा प्रश्न कायम आहे. या भागात आदिवासींना काम मिळत नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांना भटकंती करावी लागते. एवढं सगळं होऊनही या आदिवासी खेड्यांपर्यंत पोहोचण्याचे धाडस कोणीही सरकारी अधिकार करू शकत नाही. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षीतपणामुळे शासनाच्या योजना आदिवासींना मिळत नाहीत. येथे आरोग्य, रोजगार आणि पाण्याचा प्रश्न कायम आहे. या भागाचा विकास ठप्प झाल आहे. त्यामुळे प्रशासनाने आदिवासींकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
उपाययोजना राबविल्या पाहिजेत
ऑनलाइन शिक्षण आणि इतर कामांसाठी इंटरनेट आवश्यक आहे. नेटवर्कची मोठी समस्या आहे. आजही या गावांमध्ये आणि कॅम्पसमधील मुले नेटवर्कच्या समस्येमुळे अभ्यासापासून वंचित आहेत. या दिवसांमध्ये पावसामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहे. मात्र, आरोग्य सेवेअभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. शुद्ध पाण्याअभावी विविध प्रकारचे आजार होतात. शासन व प्रशासनाने गावोगावी येऊन आदिवासींच्या समस्या समजून घ्याव्या. त्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. सर्व समस्या सोडविण्यासाठी नियोजन करून प्रक्रिया पार पाडावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज
विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी या गावांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आजही आदिवासी आणि नक्षल गावांसाठी शासनाकडून विकास निधी भरपूर प्रमाणात देण्यात येत आहे. मात्र अद्यापही या निधीचा फायदा कसा आणि कुठे झाला, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्यामुळेच नक्षलवादी, आदिवासी बहुल गावे विकासापासून कोसो दूर असल्याची ओरड सुरु झाली आहे. ही सर्व बाब लक्षात घेता या गावांकडे विशेषत्वाने लक्ष देण्याची गरज आहे.