Lok Sabha Result : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यात महायुतीला यात अपयश आले. या अपयशानंतर आता महायुतीतील धुसफुस बाहेर पडू लागली आहे. महाराष्ट्रात अत्यंत चर्चेचा विषय ठरलेल्या रामटेकमध्येही महायुतीला फटका बसला. येथे शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची तिकीट कापण्यात आले. काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले.
काँग्रेसच्या श्याम बर्वे यांनी त्यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर अनेक दिवसांपासून मनात शल्य जपणाऱ्या कृपाल तुमानेंची धगधग बाहेर पडली. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. राजीव पोतदार यांचा व्हिडीओ पुढे आला आहे. त्यात त्यांनी कृपाल तुमानेंना सडेतोड उत्तर दिले आहे.
तुमाने संतापले
रामटेक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे गेली. त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न होता. दिलेल्या उमेदवारासाठी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेतली. तरीही विजय झाला नाही. त्यात भाजपची आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची काय चूक आहे, असा सवाल डॉ. राजीव पोतदार यांनी केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊनही निकाल याचचा तो आला. याचा अर्थ असा नाही की, सर्वांनी राजीनामा देत फिरायचे, अशा शब्दांत डॉ. पोतदार यांनी तुमानेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओच्या सुरूवातीला डॉ. पोतदार यांनी तुमानेंचा समाचार घेतला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या आगपाखडीचा त्यांनी निषेध नोंदविला. कृपाल तुमाने यांना रामटेकमधून दोनदा खासदार करण्यात भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी महत्वाचे काम केले. यावेळीही त्यांना उमेदवारी मिळविली असती तर त्याच पद्धतीने काम केले असते. त्यांना उमेदवारी देणं न देणं हा शिवसेनेचा प्रश्न आहे.
भाजपची मागणी
रामटेक लोकसभेची जागा भाजपाला मिळावी, ही आमची मागणी होती. शेवटी ती जागा शिवसेनाला मिळाली. तिथे कोण उमेदवार द्यावा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. अरविंद गजभिये, सुधीर पारवे यांना शिवसेनेकडून उमेदवारी द्यावी, असा प्रस्तावही आम्ही दिल्याचा खुलासा डॉ. पोतदार यांनी केला. भाजपाच्या प्रस्तावाला न मानता काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना पक्षात घेण्यात आले. त्यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आले. त्यांच्याकरिता देखील तेवढ्याच ताकदीने पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्याचेही ते म्हणाले.
सध्या केंद्रामध्ये एनडीएचे सरकार स्थापन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व नेते एनडीएमध्ये आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी काम करायला ते चालले आहेत. अशा वेळी टीका टिप्पणी करणे चुकीचे आहे. यामुळे राज्यातील वातावरण विनाकारण खराब होण्याची शक्यता आहे, असे पोतदार म्हणाले. त्यांनी तुमानेंना कुणावरही टीका न करण्याची विनंती केली. पारवे कामठी मतदार संघात मागे राहिले. त्यांचा पराभव झाला, अशीही टीका तुमानेंनी केली. कामठी विधानसभा मतदार संघाचे आमदार टेकचंद सावरकर आहेत.
सावनेर विधानसभा मतदारसंघात ते मागे आहेत. कामठी विधानसभेचा बावनकुळेंशी संबंध जोडणे योग्य नाही. निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आम्ही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले. यानंतरही निवडणुकीचा निकाल जो यायचा तो आला. याचा अर्थ आता सर्वांनी राजीनामा देउन घरी बसावं असं होत नाही. तुमानेंना भविष्यामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध राहणार आहे. त्यांनी अशा टिकटिप्पणी करणे योग्य नाही, अशी समजही डॉ. राजीव पोतदार यांनी दिली.