महाराष्ट्र

East Nagpur Constituency : खोपडेंना गाफील राहणे पडू शकते महागात!

Assembly Elections : हजारे, पांडे, पेठे देणार जोरदार टक्कर

पूर्व नागपूर म्हणजे आपला गड आहे. विजय निश्चित आहे. इतर कुठलाही पक्ष आपल्या आसपासदेखील पोहोचू शकत नाही, अशा अविर्भावात सध्या आमदार कृष्णा खोपडे आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना त्यांनी 74 हजारांची आघाडी एकट्या पूर्व नागपूरमधून मिळवून दिली होती. हे सत्य असले तरीही विधानसभा निवडणुकीत आपलाच डंका आहे, हा गैरसमज त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यंदाच्या निवडणुकीत गाफील राहणे खोपडेंना महागात पडू शकते, असे सध्याचे चित्र आहे.

पूर्व नागपूरचे पाचवेळचे आमदार सतीश चतुर्वेदी यांचे वर्चस्व संपुष्टात आणण्यात कृष्णा खोपडे यांना 2009 मध्ये यश आले. तेव्हापासून तीनवेळा खोपडेच निवडून आले. गडकरींनी पूर्व नागपुरात केलेल्या विकासकामांचाही फायदा खोपडेंना झाला. यंदा ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपणच पूर्व नागपूरचे तारणहार आहोत, या आवेशात सध्या ते फिरत आहेत. पण, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) दुनेश्वर पेठे आणि राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आभा पांडे यांना कमकुवत समजणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.

इतर मतदारसंघांमध्ये पक्षाचे पारंपरिक मतदार असतात. पण, पूर्व नागपुरात हिंदी भाषिक व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची मते निर्णायक ठरतात. यात आभा पांडे यांचा हिंदी भाषिकांवर चांगला प्रभाव आहे. दुनेश्वर पेठे यांचादेखील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून मोठा जनसंपर्क आहे. तर काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे यांनीही गेल्या अनेक वर्षांत चांगला जम बसवला आहे. यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन झाले तरीही कुण्या एकाला फायदा होण्याची दाट शक्यता आहे. अशात खोपडेंना धक्का बसू शकतो किंवा त्यांची आघाडी तरी नक्कीच कमी होऊ शकते.

2019च्या निवडणुकीत कृष्णा खोपडे यांना पूर्व नागपुरात 103992 मतं पडली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे पुरुषोत्तम हजारे यांना 79975 मतं पडली होती. जवळपास 23 हजारांची आघाडी खोपडेंना मिळाली होती. मात्र 2014 च्या तुलनेत खोपडेंची आघाडी तब्बल 27 हजारांनी घटली होती. आज देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे दक्षिण-पश्चिम आणि कृष्णा खोपडेंमुळे पूर्व नागपूरमध्ये भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पूर्व नागपूरमध्ये खोपडेंचे गाफील राहणे बंडखोरांच्या पथ्यावर पडल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!