बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून खामगाव जिल्ह्याची नव्याने निर्मिती व्हावी अशी फार जुनी मागणी आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे अनेक वर्षांपासून धूळखात पडून. मात्र राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा मार्ग अजूनही काही मोकळा झालेला नाही. मात्र खामगाव जिल्हा करण्याच्या दिशेने शासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गुरुवारी (ता. 3 ऑक्टोबर) खामगाव येथे एमएच 56 या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झाला. त्यामुळे आता एम एच 28 नव्हे तर एम एच 56 लागणार आहे. या घोषणेमुळे भाजपचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या मागणीला यश प्राप्त झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुके आहेत. त्यात घाटावर 7 तर घाटाखाली 6 तालुके आहेत. यामध्ये घाटाखालील नागरिकांना आपल्या वाहनांच्या नोंदणीसाठी बुलढाणा शहरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जावे लागायचे. म्हणजे संपूर्ण दिवस वाया जाणे आणि 200 किलोमीटरचा प्रवास, अशी कसरत होती. घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या सहा तालुक्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावे अशी मागणी होती. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी खामगाव येथे आरटीओ कार्यालय होण्याबाबत विधानसभेत वारंवार पाठपुरावा केला. अखेर शासनाने उपप्रादेशिक कार्यालयाला मंजुरी दिल्यामुळे फुंडकर यांच्या मागणीला यश आले आहे.
अनेक वर्षांची मागणी
आता विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना महायुती सरकार बहुतांश आमदारांच्या मागण्या पूर्ण करत आहे. त्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत. त्यात खामगावच्या नवीन आरटीओ कार्यालयाचाही समावेश आहे. खामगाव जिल्हा निर्मितीची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. प्रस्तावित खामगाव जिल्ह्यात मलकापूर, नांदुरा, शेगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर खामगाव तालुक्यातील गावांचा समावेश राहणार आहे. तसेच नवीन लाखनवाडा तालुक्याची मागणी होत आहे. तसा प्रस्ताव देखील सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
याबाबत अनेक बड्या नेत्यांनी आश्वासने सुद्धा दिली आहेत. तर राज्याचे दिवंगत कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर, खामगाव मतदार संघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर, काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे देखील खामगाव जिल्हा निर्मिती बाबत पाठपुरावा करत आले आहेत. यामध्ये जिल्हा निर्मिती बाबत अद्याप कोणतीही घोषणा झाली नाही. पण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाल्यामुळे जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने हे एक आश्वासक पाऊल मानले जात आहे.
असा आहे शासन निर्णय
खामगाव येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH 56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरु करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. याबाबत शासनाच्या प्रचलित धोरणानुसार नवनिर्मित उप प्रादेशिक परिवहन अधिकारी खामगाव या कार्यालयासाठी आवश्यक पदे निर्माण करण्यात येतील. तुर्तास सदर कार्यालयासाठी विहित मानांकनानुसार आवश्यक पदे इतर कार्यालयातून समायोजित करण्याची कार्यवाही परिवहन आयुक्तांनी करावी, असे आदेशात आहे. नवीन कार्यालय सुरु करण्यासाठी शासकीय/खाजगी मालकीची जागा भाडे तत्वावर घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नवनिर्मित कार्यालयासाठी एका इंटरसेप्टर वाहनास मंजूरी देण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.