Congress : जेएनयूमध्ये ‘तुकडे तुकडे’ची भाषा, नंतर देशाला तोडण्याची भाषा असा प्रवास करणारा काँग्रेसचा नेता कन्हैय्या कुमार याच्या प्रचारसभेने चांगलाच रोष निर्माण केला आहे. दक्षिण-पश्चिम मतदारसंघात देवेंद्र फडणवीस यांची आघाडी कमी करण्याची क्षमता प्रफुल्ल गुडधे यांच्यात आहे असे बोलले जात होते. मात्र त्यांच्या प्रचारार्थ देश तोडण्याची भाषा करणारा कन्हैय्या कुमार आला. त्यामुळे गुडधेंना विष पेरायला कन्हैय्याच सापडला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस नेता कन्हैय्या कुमारने या प्रचारसभेत महायुतीवर जनतेची गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. ज्या व्यक्तीने येथील सुविधांचा वापर करत देशाच्याच विरोधाची भूमिका घेतली होती, त्याच्याच तोंडून आता गद्दारीची भाषा शोभते का असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे कन्हैय्या कुमार याला जनतेने पूर्ण नाकारले आहे. बिहार येथील बेगूसराय मतदारसंघातून 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढले होते. पण त्यांचा दारूण पराभव झाला होता. आता संविधानाच्या मुद्यावरून काँग्रेससाठी प्रचार करत आहेत.
कन्हैय्या कुमार दक्षिण-पश्चिम नागपुरचे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधेंच्या प्रचारासाठी नागपुरात आले होते. रामबाग येथील प्रचार सभेत त्यांनी गद्दारीचे आरोप लावले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. ‘संविधान बदलण्यासाठी लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांनी चारशेपारचा नारा दिला होता. मात्र, विदर्भातील मतदारांनी चारशेपारचा फुगा फोडला. परंतु, ही लढाई संपलेली नाही. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. महायुतीने राज्यातील जनतेशी गद्दारी केली आहे,’ असे प्रतिपादन कन्हैय्या कुमारने केले.
Ballarpur Constituency : मुनगंटीवारांची परतफेड करण्यासाठी लाडक्या बहिणी ठाम
भाजपवाले हे धर्मयुद्ध असल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. हे धर्मयुद्ध असेल तर आम्ही पण सोबत आहोत. पण, हे युद्ध रोजगारासाठी, शेतकऱ्यांसाठी लढणार का, असा सवाल देखील केला. मात्र ही गद्दारी नेमकी कशा पद्धतीने केली आहे याबाबत कुमारने जास्त बोलण्याचे टाळले. एखादा मोठा आरोप करायचा व त्याबाबत विचारणा केल्यावर पळता पाय काढायचा ही कन्हैय्या कुमारची जुनी सवय आहे. नागपुरातच कन्हैय्या कुमारने सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी कधीही न केलेल्या वक्तव्यावरून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. एका पत्रपरिषदेत त्याबाबत विचारणा केल्यावर कन्हैय्याने तेथून पॅकअप केले होते. आता गद्दारीच्या मुद्द्यावरदेखील ठोस कारण देण्याचे कन्हैय्याने टाळले आहे.