महाराष्ट्र

Assembly Election : रविकांत तुपकरांचे ‘एकला चलो’!

Ravikant Tupkar : उद्धव ठाकरेंसोबतची चर्चा फिस्कटली

Uddhav Thackeray : शेतकरी क्रांतिकारी संघटनेची घोषणा करणारे रविकांत तुपकर यांच्यावर पुन्हा ‘एकला चलो रे…’ ची पाळी आली असल्याचे दिसून येते. बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही असलेल्या तूपकरांच्या पदरी निराशाच पडली. शिवसेना पक्षातील नेत्यांच्या प्रखर विरोधामुळे तुपकरांना उमेदवारी न देता जयश्री शेळकेंना उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी बहाल केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबतची चर्चा आता फिस्कटली असून तुपकर पुन्हा एकला चलो रे च्या भूमिकेत दिसणार आहेत.

चर्चा अपयशी

‘मातोश्री’वर झालेली रविकांत तुपकर व उद्धव ठाकरे यांची चर्चा अपयशी ठरली आहे. बुलढाण्यातून जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्याऐवजी काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी दिली जात आहे. लवकरच त्या शिवसेनेत प्रवेश करतील व त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे. रविकांत तुपकर यांच्याऐवजी जयश्रीताई शेळके यांचे नावच प्रा. नरेंद्र खेडेकर व जालिंधर बुधवत यांच्याकडून पुढे गेल्याची माहिती आहे. दरम्यान, तुपकरांनी तडकाफडकी ‘मातोश्री’ सोडली असून, जिल्ह्यातील शेतकरीवर्ग आता महाविकास आघाडीला कितपत साथ देतील? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आता उरले तीनच पर्याय..

रविकांत तुपकर व उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा फिस्कटल्यानंतर तुपकर हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. तेथे ते शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. आपल्यापुढे स्वतंत्र लढणे, वंचित आघाडीसोबत जाणे किंवा महायुतीसोबत जाणे असे तीनच पर्याय उरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी संधी दिली असती तर मतविभाजन टळले असते. यापुढे त्यांनी रविकांत तुपकरांमुळे आमची जागा गेली, असे सांगू नये, अशी भूमिकाही चर्चेतून बोलताना व्यक्त केली.

शरद पवार यांनी प्रयत्न

रविकांत तुपकर यांनी महाआघाडीसोबत यावे, यासाठी महाआघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी प्रयत्न केले होते. परंतु, बुलढाण्याची जागा शिवसेना (ठाकरे) पक्षाकडे असल्याने त्यांनी तुपकरांना उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार, ठाकरे व तुपकर यांच्यात चर्चेच्या अनेक फैरी झडल्या. तुपकरांनी महाआघाडीसोबत यावे, यासाठी उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनीदेखील चर्चा केली. बुलढाणा येथून रविकांत तुपकर यांना उमेदवारी निश्चित मानली जात असताना, आज अचानक वेगवान घडामोडी घडल्या व काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके या ‘मातोश्री’वर पोहोचल्या. त्यानंतर रविकांत तुपकर यांनादेखील बोलावून घेण्यात आले. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. एकंदरित, बुलढाण्यात शिंदे गटाचे संजय गायकवाड, शेतकरी संघटना क्रांतीकारीचे रविकांत तुपकर व ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांच्यात तिहेरी लढत निश्चित मानली जात आहे.

Nagpur constituency : उपराजधानीत मनसेपुढे प्रस्थापितांचे आव्हान !

दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या समर्थकांनी आज चिखली व सिंदखेडराजा येथून उमेदवारी नामांकन अर्ज घेतले आहेत. शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी ही माहिती दिली. कोणी कुठून अर्ज भरायचे, हे रविकांत तुपकर यांच्यासोबत चर्चा करून ठरवले जाईल, तसेच रविकांत तुपकर हे कोठून लढणार तेही लवकरच स्पष्ट होईल, असे विनायक सरनाईक यांनी सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!