Chhatrapati Shivaji Maharaj statue : फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. केवळ पुतळा कोसळला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे, या शब्दात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावरील घटनास्थळी भेट दिली. त्यापूर्वी जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘फक्त आठ महिन्यांपूर्वी बांधलेला राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. हा पुतळा पडला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान पडला आहे. मुख्यमंत्री म्हणतात प्रचंड वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे पुतळा पडला.’ तसं असतं तर दोन-तीन झाड पडली असती. पण तसं न होता फक्त पुतळा पडला. याचा अर्थ पुतळ्याचं काम सदोष होतं. अपरिपक्व माणसाला पुतळ्याचं काम दिलं. दीड-दोन फुटांचे पुतळे तयार करणाऱ्या व्यक्तीला 35 फुटाच्या पुतळ्याचे काम दिले,’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
सरकार म्हणतंय पुतळा नेव्हीने बांधला आहे. सरकारला हात झटकून चालणार नाही. जबाबदारी सरकारचीच आहे. नेव्हीच्या लोकांनी फक्त पुतळा तिथे बसवला. हा शिल्पकार आपटे कोणी शोधला? कोणी नेव्हीला त्याची माहिती दिली? तो कल्याणचाच कसा? या पुतळ्याचे टेंडर काढले गेले नाही मग त्यालाच कसे कंत्राट मिळाले? या सर्व गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
हा तर केविलवाणा खटाटोप
सरकारने कोणतीही शहानिशा न करता गुन्हा कसा दाखल केला? गुन्हा दाखल करणे म्हणजे आपण काही तरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा खटाटोप सरकार करत आहे. सरकारला तोंड दाखवायला जागा राहिली नाही. फक्त टेंडर काढणे, जवळच्या लोकांना कंत्राट देणे, त्या कामाचा इव्हेंट करणे त्यापलीकडे सरकार काहीच करत नाही, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. आता सरकारने राज्यभरातील शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
चौकशी करायची असेल तर
या प्रकरणाची सरकारला खरंच चौकशी करायची असेल तर दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्र्यांनी बसून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची निवड करावी. त्यांच्या अध्यक्षतेत ही चौकशी करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.
रयतेचे राज्य येईल
‘या वाईटातून काहीतरी चागलं होईल’ असं म्हणणाऱ्या मंत्र्यांच्या बुध्दीची कीव वाटते. आता शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे हे सरकार जाईल आणि रयतेचे राज्य येईल. ज्यांना 28 फुटाचा पुतळा व्यवस्थित उभारता आला नाही ते आता 100 फुटांची चर्चा करताहेत, असा टोलाही शेवटी त्यांनी लगावला.