महाराष्ट्र

Nitin Gadkari : साहेब, बदली करून द्या!

Janta Darbar : जनता दरबारमध्ये गडकरींना साकडे

Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनता दरबार वैविध्यपूर्ण निवेदनांनी सजला असतो. कुणी नोकरीसाठी, कुणी रस्त्यांच्या कामांसाठी तर कुणी बदलीसाठी त्यांना साकडे घालतात. रविवारी झालेल्या जनता दरबारात बदलीसाठी आलेल्या अर्जांची संख्या जास्त असल्याचे समजते. 

गडकरी है तो मुमकिन है’

सरकारी नोकरीत बदली मिळवणे सोपे काम नाही. पण ‘गडकरी है तो मुमकिन है’ असे लोकांना वाटत असते. त्यावर गडकरी यांचा खास डायलॉगही प्रसिद्ध आहे. ‘प्रत्येक काम मी करू शकत नाही. होत असेल तर हो म्हणतो नाही तर स्पष्ट नाही म्हणून सांगतो. मी काही चमत्कार करून अंगारा वाटणारा बाबा नाही’, असं ते कायम म्हणत असतात. जनसंपर्क कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने लोक निवेदनं आणि तक्रारी घेऊन येतात. तिथेही त्यांची भूमिका ते वेळीच स्पष्ट करतात.

काही कामे न होण्यासारखी असतात तर ते लगेच सांगतात. तर काही नियमांममध्ये बसणारी नसतात तर त्यासंदर्भातही ते काही मिनिटांत का होईना चर्चा करतात. विशेषतः बदल्यांची कामे मी करत नाही, असं ते कायम म्हणत असतात. नेमके याच कामांसाठी लोक त्यांच्याकडे गर्दी करतात. जनसंपर्क कार्यक्रमात आलेल्या काहींच्या अडचणी तपासून कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी केल्या, हा भाग निराळा.

जनसंपर्क कार्यक्रमात विविध मागण्यांच्या निवेदनांची गर्दी होती. गडकरी यांची भेट घेण्यासाठी सकाळपासून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी अनुकंपा, बदली यासारख्या विषयांसह रस्त्यांच्या मागणीचे निवेदनेही त्यांना देण्यात आली. खामला येथील ज्युपिटर शाळेच्या शेजारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा उपक्रम झाला. विविध संस्था, संघटनांचे लोक आपली निवेदने घेऊन पोहोचले. याशिवाय व्यक्तिगत समस्या मांडण्यासाठीही लोकांनी गडकरींची भेट घेतली. यामध्ये विशेषत्वाने बदलीसाठी, अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी, नवीन रस्त्यांच्या मागणीसाठी लोकांनी निवेदने दिली.

समस्येचे निराकरण

गडकरी यांनी निवेदने स्वीकारून लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. यासोबतच मलवाहिन्या, वीजजोडणी आदींच्या संदर्भातील तक्रारीही नागरिकांनी मांडल्या. दिव्यांग बांधवांनी कृत्रिम अवयवांसाठी निवेदने दिली. कुणाला पायाची तर कुणाला हाताची आवश्यकता आहे. त्यांना आवश्यक मदत करण्याच्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या. नागपुरातील विविध संस्थांच्या महिलांनी गडकरी यांना नवरात्रातील उपक्रमांचे निमंत्रण दिले. वैद्यकीय मदतीसाठी देखील अनेकांनी अर्ज केले. कुणी उपचारासाठी तर कुणी औषधांसाठी सहकार्य करण्याची विनंती गडकरींना केली. त्यादृष्टीने तातडीने मदत करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

Nitin Gadkari : रविंद्र चव्हाण म्हणाले, नितीन गडकरी म्हणजे इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर मॅन 

गडकरींना बघायला आले महिला मंडळ!

जनसंपर्क कार्यक्रमात काही महिला मंडळं गडकरींना भेटण्यासाठी पोहोचली. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या महिलेने सर्वांची ओळख करून दिली. त्याचवेळी ‘यांना तुम्हाला बघायचं होतं’ असं त्या महिलेने सांगितलं. त्यावर गडकरींना हसू आवरले नाही. खास आपल्या शैलीत गडकरींनी मिश्किली केली. त्यानंतर महिलांमध्येही हशा पिकला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!