अभिजित घोरमारे
Bhandara District : अडीच वर्षानंतर तुमसर मोहाडी बाजार समितीची निवडणूक झाली. 28 मे रोजी बाजार समिती सभापती, उपसभापतीची निवडणूक होणार आहे. बाजार समितीमध्ये सत्तापक्ष आणि विरोधक एकत्र येऊन अनोखे पॅनल तयार करण्यात आले होते. त्याची चर्चा आहे. वरिष्ठांच्या युती-आघाडीचे नियम डावलून पॅनल तयार झाले. सीआयडी चौकशी निमित्त बाजार समितीत झालेल्या एन्ट्रीची भंडारेकरांना आठवण झाली. सीआयडी दबावाखाली अनोखे पॅनल तयार केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.
देशात ‘ईडी’, राज्यात ‘सीआयडी’ची भीती
तुमसर- मोहाडी बाजार समिती निवडणुकीचे नोटीफिकेशन येताच राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व राज्य शासनाच्या पणन विभागाने एंट्री केली. बारा वर्षांपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्र गावनिहाय जोडणी प्रकरणाबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व पणन विभागाने लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश बाजार समितीला दिले. अचानक निवडणूक तोंडावर असताना बारा वर्षांपूर्वी आधारभूत धान खरेदी केंद्राला गाव जोडणी कशी करण्यात आली,यात अनियमितता झाल्याची शंका राज्य गुन्हे अन्वेषण विभाग व पणन महासंघाला झाली.त्यामुळे सविस्तर उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आले.यामुळे बाजार समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली.ही बाब अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली.
अन् पॅनल तयार झाले!
आता सीआयडी चौकशी क़ाय शोधून काढ़ते याची वाट सर्वजण पाहात होते. अचानक बाजार समितीत अनोखे पॅनल तयार झाले. या पॅनलमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकत्र दिसले. उमेदवारांची नावे लक्षात घेतली असता भंडाराकरांचे आणि राजकीय जाणकारांचे डोके चक्रावले. सीआयडी, पणन विभागाची चौकशी आणि तयार झालेले पॅनल हा योगायोग कसा, याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली. बाजार समितीची कागदपत्रे आणि सीआयडीने कागदपत्रांची केलेली चौकशी;त्यातून पॅनल तयार झाले का, असे बोलले जात आहे.