IPS officer Shivdeep Lande : बिहार राज्यात धडाकेबाज कारवाई करीत सिंघम अधिकारी अशी ओळख निर्माण करणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर रोजी पदाचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करीत माहिती दिली होती. दरम्यान शिवदीप लांडे यांनी राजीनामा का दिला याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे हे आता राजकारणाच्या आखाड्यात जातील अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली होती. अनेकांनी तशा बातम्याही माध्यमातून दिल्या. मात्र या सगळ्या चर्चांना अखेर शिवदीप लांडे यांनी स्वतः विराम दिला आहे. पुन्हा त्यांनी फेसबुक पोस्ट द्वारे ही माहिती दिली आहे.
अकोल्याचे..
शिवदीप लांडे मूळचे अकोला जिल्ह्यातील पारस या गावातील रहिवाशी आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. शिवदीप लांडेंसारख्या अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. ते राजकारणात जातील अशी चर्चाही जोरात सुरू होती. राजीनामा देणारे शिवदीप लांडे यांची ओळख करुन द्यायची गरज नाही. मात्र त्यांची एक खास ओळख म्हणजे ते शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
IPS officer Shivdeep Lande : विदर्भाच्या ‘सिंघम’ची पोलीस सेवेतून अचानक एक्झिट !
राजकारणाच्या चर्चेला विराम!
बिहार मधील पूर्णियाचे आयजी शिवदीप लांडे यांनी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही. सामील होण्याची शक्यता त्यांनी स्वतः नाकारली आहे. पांडे यांनी फेसबुक पोस्टवर लिहिले आहे. ‘काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मी कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. सामील होण्याबद्दल बोलले आणि लिहिले जात आहे. ते पूर्णपणे चुकीचे आहे. मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही,’ असं शिवदीप लांडे यांनी म्हटलं आहे. सर्वप्रथम, मी सर्वांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. कारण कालपासून मला जे प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे, त्याची मी कल्पनाही केली नव्हती. कृपया माझे नाव कोणत्याही पक्षाशी जोडू नका,’ असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.
त्यांच्या भावकडूनही नकार!
शिवदीप लांडे यांचे भाऊ कालीन लांडे यांच्याशी ‘द लोकहीत’च्या प्रतिनिधीने संपर्क साधला. त्यांनीही शिवदीप लांडे हे राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं आहे. सध्यातरी असं काही ठरलं नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. शिवदीप लांडे यांचे भाऊ कालीन लांडे हे बाळापूर मतदारसंघातून एकदा शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढले आहेत. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. आता ते शिवसेना शिंदे गटात आहेत.