Money Laundering Case : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर नवीन आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. त्यावेळी परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर वसुलीचे आरोप केले होते. परमबीर सिंग म्हणाले, अनिल देशमुख वसुली करत होते. त्याची कल्पना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना होती असे सिंग म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीच मला 100 कोटीच्या वसुली प्रकरणात अडकवले, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.
सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांना उत्तर देत आपण परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची नियुक्ती केली नव्हती असे म्हटले आहे. सचिन वाझेने कॅमेरा समोर येत अनिल देशमुख पीए मार्फत पैसे घ्यायचे असा आरोप केला. अशात आता परमबीर सिंग यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. मात्र परमबीर सिंग यांनी हे आरोप फेटाळले.
काहीच नव्हते ते सांगत आहेत
तीन वर्षांपासून काहीही नव्हते. अचानक आता अनिल देशमुख सांगत आहेत, की आपण देवेंद्र फडणवीसांशी डील केले. अनिल देशमुख टार्गेट करत आहेत कारण त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. अनिल देशमुख यांनी सोनू जलान आणि रियाज भाटी या दोन गुन्हेगारांची मदत घेऊन आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले. हे दोघे बऱ्याचवेळा संजय पांडेंच्या मदतीने अनिल देशमुख यांची भेट घ्यायचे, असेही परमबीर सिंग यांनी सांगितले. संजय पांडे यांनीही आपल्यावर दबाव आणला होता. देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख भेटले. सलील म्हणाले की 100 कोटींच्या वसुलीसंदर्भात जे पत्र लिहिले आहे ते मागे घ्या. पोलिस महासंचालक करू अशी ऑफर सलील यांनी दिल्याचे सिंग म्हणाले.
सलील पाया पडला होता. जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. हा पैसा पार्टी फंडात जायचा. आपल्या आरोपात अगदी दहा भ्रष्टाचारही आलेला नाही. खंडणीची अनेक प्रकरणे आहेत. आपण स्वतः शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हे सांगितले होते. मात्र त्यांनी याकडे डोळेझाक केली, कारण त्यांना हे सगळे आधीच माहिती होते. सत्य काय आहे ते कळावे, यासाठी सत्ताधारी शिवसेनेने बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. वाझे हे अविभाजित शिवसेनेचे नेते असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला.
वाझे अनिल देशमुख गृहमंत्री असताना गृह खात्याच्या बैठकांमध्ये भाग घ्यायचा आणि शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अहवाल द्यायचा. शिरसाट म्हणाले की, न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा अहवाल महाविकास आघाडी (MVA) सरकार सत्तेवर असताना सादर करण्यात आला होता. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर लावलेल्या लाचखोरीच्या आरोपांची आयोगाने चौकशी केली होती. देशमुख यांना क्लीन चिट मिळाल्याच्या दाव्यावर शिरसाट म्हणाले, अहवाल त्यांना अनुकूल होता, तर तो प्रसिद्ध का केला नाही?