IPS Lohit Matani : भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी पुन्हा एकदा गुंडावर लगाम कसला आहे. लोकसभा निवडणूक व आगामी काळातील उत्सव शांततेत व्हावेत यासाठी जिल्ह्यात पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
लोहित मतानी यांनी डहाट टोळीतील सात सदस्यांना भंडारा जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यांच्या या कारवाईने गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये दहशत पसरली आहे. समाजविघातक कारवायांमध्ये डहाट टोळीतील हे सदस्य 2017 पासून सक्रिय आहेत. टोळीतील या सदस्यांविरुद्ध विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्ह्यांची नोंद आहे. तुमसर पोलिस ठाण्यात या टोळीतील सदस्यांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, दंगा, गंभीर दुखापत, खंडणी, दरोड्याची पूर्वतयारी अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
डहाट टोळीने अशा गुन्ह्यांच्या माध्यमातून संघटीत गुन्हे करणारी टोळी अशी ओळख निर्माण केली आहे. समाजविघातक या टोळीवर भंडारा पोलिसांनी अंकुश लावत त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा प्रमुख सौरभ नंदकिशोर माने, टोळीतील सदस्य प्रशांत प्रभू गभणे, आशिष नरेंद्र गजभिये, निशिकांत किशोर राऊत, मंगेश प्यारेलाल गेडाम, योगेश हिरालाल गायधने (सर्व रा. तुमसर), कैलास सहादेव साठवणे (रा. कमकासुर) यांचा समावेश आहे. सराईत गुन्हेगारांवर असलेल्या (Crime News) गुन्ह्यांची माहिती घेत पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी या सातही जणांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून घेतला.
भंडाऱ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी लोहित मतानी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यातून गुन्हेगारीचा अस्त करणे हाच एकमेव हेतू पोलिस अधीक्षक मतानी यांनी डोळ्यापुढे ठेवला आहे. त्यासाठीच त्यांनी तुमसरच्या पोलिस निरीक्षकांकडून हद्दपारीचा प्रस्ताव मागवून घेतला होता. लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून 22 मार्च रोजी गुन्हे अभिलेख तपासत मतानी यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम 55 अनुसार कारवाई केली आहे.