महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar : महाविकास आघाडीत अडेलपट्टूपणा

Mahavikas Aghadi : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका

Assembly Election : ‘सामना’मधून किंवा संजय राऊत यांच्या तोंडून केवळ टीका करण्याचा एकमात्र कार्यक्रम सध्या सुरू आहे. सामान्यांच्या हिताशी संबंधित कोणतेही लिखाण किंवा विधान केले जात नाही. एखाद्या घड्याळीतील पक्षी निघतो. वेळ झाली की आवाज करतो. त्यानंतर पुन्हा आत चालला जातो. अगदी त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या लोकांचे सध्या सुरू आहे, अशी टीका राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शुक्रवारी (ता. 27) ते नागपुरात बोलत होते.

महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधक काहीच बोलताना दिसत नाहीत. विकासाच्या एकाही योजनेवर बोलताना दिसत नाहीत. महाविकास आघाडीमध्ये कोणीही विशेषत: शिवसेना (Shiv Sena) तर अजिबातच विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही. पाहून घेऊ, बघून घेऊ अशी त्यांची भाषा असते. कपोलकल्पित कथा रचल्या जात आहे. त्यातून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. महायुती (Mahayuti) सरकार केवळ विकासाच्या मुद्द्यावर बोलत असते, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले.

दोषीला शिक्षा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट (Malvan Rajkot) येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. यासंदर्भात सरकारने चौकशी समितीची नेमणूक केली होती. चौकशी समितीने आता आपला अहवाल सादर केला आहे. यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाष्य केले. ते म्हणाले, याप्रकरणात दोषी असणाऱ्याला शिक्षा मिळेल. चौकशी समितीने आपला अहवाल दिला आहे. त्यानुसार सरकार कारवाई करेलच. परंतु त्यानंतरही यामुद्द्यावर निव्वळ राजकारण करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. एखादी दु:खदायक घटना घडल्यानंतर दोषींना शोधण्यासाठी चौकशी केली जाते. कारवाई नक्कीच होते. परंतु अशा घटनांचे राजकारण खुर्चीसाठी करणे सर्वस्वी अयोग्य असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar : बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील गरिबांना हक्काचं घर

साधा पाऊस जरी झाला तरी सरकारवर टीका केली जात आहे. कोणत्या मुद्द्याचे सत्तेसाठी किती राजकारण करायचे, याचे भान विरोधकांना नाही. राज्यात गेल्या 55 वर्षात मेट्रो नव्हती. रस्त्यांचे जाळे पाच हजार किलोमीटरपेक्षही कमी होते. त्यामुळे विरोधकांनी विकासच केला नव्हता. केवळ खोट्याच्या आधारावर त्यांना आता सत्ता मिळवायची आहे. विकास कधीच केला नाही, अशी विरोधकांची स्थिती असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. मध्यंतरीच्या काळात विरोधकांनी आणखी एक अफवा पसरविली की, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीचा प्रकल्प (Butibori MIDC) गुजरातला नेण्यात येणार आहे. त्यात तथ्य नसल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.

जागांवरून तणाव नाही

महायुतीत जागा वाटपावरून कोणताही तणाव नाही. प्रत्येकच पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या असे वाटत असते. त्यात गैर काहीच नाही. महायुतीत सामंजस्याचा भाव आहे. महाविकास आघाडीत अडेलटट्टूपणा आहे. महायुतीमध्ये जागांसाठी कोणतीही प्रतिष्ठेची लढाई (Ego Point) नाही. ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचे प्राबल्य असेल तेथे त्याला निवडणूक लढण्याची संधी मिळेल. राज्यात महायुतीचे सरकार यावे ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. महायुतीमधील सर्व घटकपक्षाच्या कार्यकर्त्यांची देखील हिच इच्छा आहे. त्यामुळे जागा वाटप योग्य पद्धतीने होईल, असे मुनगंटीवार ठामपणे म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!