NCP Politics : लोक सभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार मानले जात आहे. त्यामुळे अजित पवार यांना टार्गेट करणे बंद करा. अन्यथा आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा भाजपला आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यावर मिटकरींना सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांनी माहिती घेऊनच कोणत्याही विषयी बोललं पाहिजे अशा सूचना मी त्यांना दिल्या आहे, असे तटकरेंनी म्हटलं आहे. माध्यमातून तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना टार्गेट करण्यात आले होते. त्यानंतर भाजपच्या एका बैठकीत अजित पवार यांच्यामुळे आपला पराभव झाला, अशा पद्धतीची भावना काही आमदारांनी व्यक्त केली. यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, माझं त्यांना सांगणं आहे की, जर जाणीवपूर्वक अजित पवारांना टार्गेट केलं जात असेल तर आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल,’ अशा शब्दात आमदार अमोल मिटकरी यांनी भूमिका स्पष्ट केली होती. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार अमोल मिटकरी यांचे कान टोचले आहेत. सुनील तटकरे हे अहमदनगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काय म्हणाले तटकरे?
आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानावर सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे म्हणाले की, अमोल मिटकरींनी जे विधान केलं आहे. त्याबाबत मी लवकरच त्यांच्याशी चर्चा करेन. त्यांनी एखाद्या विषयावर पूर्ण माहिती घेऊन बोलायला हवं, अशी माझी त्यांना सुचना आहे, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली. तसेच भारतीय जनता पक्ष अजित पवारांना लक्ष्य करत नसून काही लोक जाणीवपूर्वक अशाप्रकारे बातम्या पसरवण्याचे काम करत आहेत, असेही तटकरे म्हणाले.
विदर्भात आणि मराठवड्यात महायुतीला कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र, ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तिथे महायुतीच्या उमेदवाराला चांगली मतं मिळाली आहेत. काही लोकांकडून जाणीवपूर्वक अजित पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कमीपणा दाखवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असा आरोपही तटकरे यांनी केला.
पुन्हा केले विधान
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी भाजपला सुचक इशारा दिल्यानंतर 19 जून रोजी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपने आमची मतं घेतलीत. मात्र, त्यांची मतं भाजपला मिळालीच नसल्याच्या गंभीर आरोपाचा पुनरूच्चार मिटकरींनी केला आहे. मिटकरी हे अकोल्यात बोलत होते.
भाजपला राज्यात मिळालेल्या 9 जागा अजित पवार आणि शिंदेंच्या शिवसेनेमूळेच मिळाल्याचा दावा त्यांनी केला. भाजपची मतं मिळाली असती तर आमचा बारामतीसह चार जागांवर पराभव झालाच नसता, असेही मिटकरी म्हणाले. त्यामुळे मिटकरींच्या या वक्तव्यामुळे महायुतीत आता पुन्हा नव्याने वाद पेटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.