Central Jail Amravati : अमरावती येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये दोन बॉम्बसदृश वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली. पैकी एका बॉम्बचे सदृश चेंडूचा स्फोट झाला. अमरावतीचे पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्यासह फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पथक तसेच बॉम्बशोधक पथक कारागृहात पोहोचले. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाने कारागृहातील बराक क्रमांक 6 आणि 7 मध्ये पडलेली बॉम्बसदृश वस्तू निष्क्रिय करून जप्त केल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
6 जुलै रोजी रात्री उशिरापर्यंत कारागृहातील अंतर्गत तपासणी सुरू होती. कारागृहाच्या मागील बाजूने प्लास्टिक बॉलमधून दोन फटाके आत फेकण्यात आले. ते दोन बॅरेकच्या मधोमध येऊन पडल्याची माहिती मिळाली. ते दोन्ही प्लास्टिक बॉलमध्ये असलेले फटाके, सुतळी बॉम्बसदृश असल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे. त्या बॉम्ब चे अवशेष तपासणी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले असून, नेमकं काय आहे ते तपासात समोर येणार आहे.
मोठी खळबळ
अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात दोन बॉम्ब फेकल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी बॉम्बसदृश्य वस्तू बॉलच्या स्वरूपात असल्याची माहिती दिली. कारागृहात कोणीतरी वरून बॉलच्या स्वरूपात फटाका फेकला. यापैकी एक फटाका वरच फुटला. बॉल कारागृहाच्या परिसरात आढळून आला. बॉम्बशोधक पथकाने हा बॉल जप्त केला असून फॉरेन्सिक युनिटची टीम या प्रकरणाचा तपास करेल, अशी माहिती पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.
कारागृहात बारूद भरलेले बॉल नेमके कोणी फेकले? याचा तपास केला जात आहे, अशी माहिती देखील पोलिस आयुक्तांनी दिली.
तुरुंगातुन सुटलेल्या कैद्यांनी जल्लोष म्हणून फटाके फेकल्याचा संशय सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे. अमरावती कारागृहातून सुटलेल्या कैद्यांना पोलिसांनी चौकशीला बोलावले होते. यामधून ही घटना तर.. नाही घडली? यावर संशय व्यक्त केला जात आहे. या सर्व घटनेमुळे कारागृहाच्या व्यवस्थेवर आणि संरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.