Yavatmal District News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे सुपुत्र ययाती नाईक विधानसभा लढणार आहेत. तसे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे पुसद विधानसभेच्या रिंगणात विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक यांच्यात सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांच्या घरातच उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. इच्छुक सुद्धा सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे राजकारणात सख्या नात्यामध्ये सुद्धा फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मध्येही एका राजकीय घराण्यात फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे.
चूरस रंगणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनोहर नाईकांचे दोन्ही पुत्र विधानसभा निवडणूक लढवू शकतात. ते एकमेकांच्या विरोधात उभे राहणार असल्याची शक्यता आहे. पत्रकार परिषद घेऊन मनोहर नाईक यांचे पुत्र ययाती नाईक यांनी आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुसद विधानसभेत विद्यमान आमदार इंद्रनील नाईक विरुद्ध ययाती नाईक असा सामना रंगणार आहे. या दोन्ही नाईक पुत्रात लढत रंगण्याची शक्यता आहे.
पक्ष नेमका कोणता?
ययाती नाईक यांनी निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. ते नेमके कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतील अशी चर्चा आहे. ययाती नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. आपल्यासाठी अनेक पर्याय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांच्यासोबत जात असताना मला कुठलीही विचारणा करण्यात आली नाही. मोहिनी नाईक यांचं नाव लोकसभेसाठी आलं असता चर्चाही केली नाही, अशी खंतही ययाती नाईक यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली नसल्याचंही ययाती नाईक यांनी सांगितलं. आपण शरद पवार गटात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आगामी विधानसभेकरीता दावेदारी केली आहे.
PM Oath Ceremony : पटेल म्हणाले मी नाही बोललो; सोहळ्यालाही दांडी
म्हणून मला खंत!
शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन झाला. हे होत असताना सुधाकरराव नाईक सोबत होते. आमचं संपूर्ण कुटुंब शरद पवार यांच्यासोबत होते. पण त्यानंतर अजित पवार यांनी एक छोटा गट स्थापन करत केला. त्यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात इंद्रनिल त्यांच्यासोबत गेले. ते मला न विचारता गेले. मला खंत आहे की, त्यांनी दोन मिनिटं बोलून विचारलं असतं. आपण काय निर्णय घ्यायचा, तर कदाचित हे चित्र दिसलं नसतं, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.