Cricket Team India : मागील वर्षी एक दिवसीय विश्वचषकाच्या अंतिम पेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. याची सल प्रत्येक भारतीयाला होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कांगारूंना पराभूत करत भारताने विजय मिळवला. हा विजय मिळाल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानानं भरून आला.
राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (ता. 30) नागपुरात पत्रकारांशी बोलताना भारतीय संघ आणि भारतवासीयांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकू, असा विश्वास होताच. पण त्यावेळी बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील.
पूर्ण विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने रन काढलेले नाही, मात्र विराटने फायनलमध्ये हा विजय खेचून आणला. देशातील सर्व लोकांना अभिमान वाटावा, असा हा तो क्षण होता. यापूर्वी अनेकदा विजयाच्या जवळ पोहोचूनही तो विजय मिळवता आला नव्हता. पण यावेळी भारतीय संघाने ते करून दाखवले. भारताने 2007मध्ये महेंद्र धोनीच्या नेतृत्वात पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. काल देशवासीयांना पहिल्या विजयाचीही आठवण झाली, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
अजित पवारांची उपयुक्तता कमी झाली..
सत्र न्यायालयाच्या बदलीसंदर्भात विचारले असता, यावर मी काही बोलणार नाही. ईडीने पुन्हा शिखर बँक घोटाळ्याची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवारांची उपयुक्तता कमी झाली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ इच्छित नाही, असं दिसतंय. कदाचित त्यामुळे त्यांना बदनाम करणे आणि संपवण्याचा प्रयत्न नव्याने करण्याचे हे षड्यंत्र आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
इंद्रायणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगाचे केमिकल प्रदुषण वाढवत आहे. त्यावर कुठली कारवाई होत नाही. कारवाई होणार कशी, कारण उद्योजकांकडून वसुली सुरू आहे. उद्योग म्हणजे माणसांचं आयुष्य कमी करण्याचा काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालूनही अशा महत्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष होत असेल तर हे आपलं दुर्दैव आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.