Doubts on EVM : मागील निवडणुकीनंतर एक चर्चा देशभर जोरात होती आणि तोच मुद्दा विरोधकांनीही उचलून धरला होता. तो म्हणजे ईव्हीएमचा. या निवडणुकीतही ‘ईव्हीएम मध्ये खरंच गडबडी होते का..?’ हा विषय चर्चेत आहे. पूर्व विदर्भातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडले. त्यानंतर सर्व ईव्हीएम 4 जूनपर्यंत कळमना बाजारातील स्ट्राँगरूम मध्ये बंदिस्त ठेवण्यात आल्या आहेत. पण ईव्हीएममध्ये गडबड तर होणार नाही ना…, अशी शंका लोकांमध्ये आहे.
मागील दोन निवडणुकांत काही लोकसभा मतदारसंघात अनपेक्षित व धक्कादायक निकाल लागले होते. त्यानंतर अनेकांनी ईव्हीएम वर शंका व्यक्त केली होती. इंडिया आघाडीने बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे ईव्हीएम बाबत सर्वसामान्यांमध्ये अजूनही संभ्रम आहे. सध्या सुरू असलेल्या चर्चां मुळे यात अधिकच भर पडत आहे. 19 एप्रिलला पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर-वणी-आर्णी, भंडारा-गोंदिया व गडचिरोली-चिमूर या पाच मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्षांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत.
Lok Sabha Election : अमरावतीच्या मतदानाला ईव्हीएमचा तांत्रिक खोडा
राजकीय विश्लेषका कडून अंदाज बांधण्यात येत आहेत. दुसरीकडे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर यापूर्वीच अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली. परंतु निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक होत असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. ईव्हीएम विरोधात मोठी मोहीमही सुरू करण्यात आली होती. अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. सामान्य नागरिकांमध्येही ईव्हीएम बाबत विविध तर्क लावले जात असून चर्चा होत आहे.
चौकाचौकांत सध्या तरी निवडणुकीचीच चर्चा होताना दिसत आहे. कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाला किती मते मिळतील, कोणत्या भागातील मते कुणाच्या बाजूने गेली, जातीय समीकरणांचीही चर्चा होत आहे. त्याचसोबत ईव्हीएमचीही चर्चा आहे. ईव्हीएम मध्ये गडबड होणार तर नाही, ते तसेच राहतील का, ईव्हीएम मध्ये खरच गडबड होते का, असे अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. या निवडणुकीबाबत अनेकांनी निकालाबाबत तर्क बांधून ठेवले आहेत. त्यापेक्षा वेगळा निकाल लागल्यास ईव्हीएम मध्ये गडबडी होते, हे स्पष्ट होईल, अशीच चर्चा होत आहे.