Bhandara Gondiya constituency : भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीचा प्रचार अभियान दुसऱ्या टप्प्यात पोहोचला आहे. अभियान दरम्यान उमेदवार गावागावात पोहोचून मतदारांचे आशिर्वाद घेत आहेत. मात्र, रिंगणातील 18 उमेदवारां पैकी बोटावर मोजण्या एवढ्याच उमेदवारांचा प्रचार पहावयास मिळत आहे. त्यातही काही उमेदवार प्रचारगाड्यांच्या माध्यमातून दिसून येत आहेत. असे असतानाही रिंगणात थेट लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अपक्ष व काही प्रादेशिक पक्षाचे उमेदवार जिंकण्यापेक्षा पराभवातच आनंद मानण्यापुरतेच निवडणूक लढवित आहेत काय? असा सवाल अपक्षांच्या भूमिकेवर निर्माण केला जात आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुक 19 एप्रिल रोजी होत आहे. रिंगणात राजकीय पक्षासह एकूण 18 उमेदवार भाग्य आजमावित आहेत. उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवाराकडून संपर्क अभियान,प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर प्रचाराचे वाहन गल्लोगल्लीत पहावयास मिळत आहेत. मात्र, 18 पैकी दोन चार उमेदवारांशिवाय इतर उमेदवारांचा कुठेही थांगपत्ता दिसून येत नाही. त्यामुळे भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन आघाडीच्या उमेदवारातच थेट लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. असे असतानाही प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार रिंगणात कुठेही दिसून येत नसल्याने लढतीतील उमेदवारांचे समीकरण बिघडविण्यापुरती त्यांची भूमिका तर नाही? अशी चर्चा सुरू झाली आहे.
एवढेच नव्हे तर रिंगणात अनेक उमेदवारांना जिंकण्यासाठी कस लावण्यापेक्षा अमुकतमूक उमेदवाराचा कसा पराभव होईल. याचे समीकरण मांडले जात आहे. त्यातच त्या उमेदवारांना आनंद मिळत असावा असे बोलले जात आहे. काही उमेदवारांना तर निवडणूक लढविण्याची हौस असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकड़े निवडणूक म्हटले की, उमेदवारापेक्षा कार्यकर्तेच उत्साही दिसून येतात. वाहन मिळेल आणि प्रचाराच्या नावाखाली गल्लीबोळात फिरणे होईल.या आशेवर असलेल्या कार्यकर्त्यांना कुणीही विचारत नसल्याने त्यांच्यात निराशा पहावयास मिळते. त्यामुळेच गल्लोगल्लीत फिरणाऱ्या वाहनांची मर्यादित झाल्याचे पाहायला मिळतआहे. निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असताना अद्यापपर्यंत गोंदियात प्रचाराची रंगत सुरू झाली नाही. निवडणुकीत समर्थ कार्यकर्त्यांची साधी विचारपूस ही होत नसल्यामुळे कार्यकर्ते निरुत्साही दिसत आहेत.