Lok Sabha Result : रावेर लोकसभा मतदारसंघात महायुती भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी घेतला. त्यामुळे एकनाथ खडेस यांचं पाठबळ रक्षा खडसेंना मिळाल्याने रक्षा खडसे यांचं पारडं जड मानलं जात होतं. दरम्यान निकाल हाती आला आणि या मतदारसंघात रक्षा खडसे यांनी विजय मिळवला. मात्र, असे असतांना मतदार संघातील 8 मतदान केंद्रांवर रक्षा खडसेंसह सर्वच उमेदवारांना शून्य मते मिळाली आहे.
मतदारांची बहिष्काराची भूमिका
रावेर लोकसभा मतदारसंघाच्या 8 मतदान केंद्रांवर मतदारांनी बहिष्काराची भूमिका घेतली होती. त्यामुळे या आठ केंद्रांवर मतदानच झाले नसल्याने, भाजपच्या विजयी उमेदवार रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्यासह सर्वच उमेदवारांना शून्य मते मिळाली आहे. या आठही मतदान केंद्रांतर्गत असलेल्या मतदारांनी, आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला होता. यानंतर प्रशासनाला या गावकऱ्यांची समजूत घालण्यात यश आले नाही.
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातील 7 मतदान केंद्रांवर मतदारांनी बहिष्कार टाकला होता. यामुळे भुसावळ विधानसभा मतदारसंघातील 41 ते 46 आणि 103 या मतदान केंद्रांवरून सर्वच उमेदवारांना शुन्य मते मिळाली आहेत. तर जामनेर शहरातील 93 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर उमेदवारांना एकही मत मिळालेले नाही. केंद्र क्रमांक 291 या मतदान केंद्रावर देखील शून्य मतदान झाले आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण 11,72,154 मतदारांनी मतदान केले आहे. त्यातील 4100 मते ही नोटाला मिळाली आहेत. श्रीराम ओंकार पाटील यांना सर्वात कमी 749 मते मिळाली आहेत. दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी 2 लाख 62 हजार मतांनी विजयाची हॅट्रिक केली आहे.
चौथ्या टप्प्यात झालेल्या रावेर लोकसभा मतदारसंघात 2019 मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. 2019 मध्ये रावेर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी 61.40 टक्के होती. तर यावेळी मात्र रावेर लोकसभा मतदारसंघात 64.28 टक्के मतदान झाले आहे.