प्रशासन

Sudhir Mungantiwar : वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले रोखा !

Forest Minister : वनमंत्री मुनगंटीवार यांचे वनविभागाला तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात सात वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची घटना शुक्रवारी (ता. 20) घडली. घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलाचा मृतदेह झुडुपांमध्ये आढळला. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कमी करून वन्यप्राण्यांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा, असे निर्देश राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

शुक्रवारी (ता. 20) चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात सिनाळा येथील सात वर्षीय भावेश मंगेश झरकर या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यामुळे मृत्यू झाला. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्याचे वनमंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. त्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेऊन मुलाला बिबट्याने उचलून नेल्याची माहिती होताच मुलाचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पुढे मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर मुलाच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाख रुपयांची मदत देण्याची सूचना केली.

शोधमोहिम

शुक्रवारी (ता. 20) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सात वर्षीय मुलाला बिबट्याने उचलून नेल्याच्या घटनेची माहिती होताच वनमंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनाला तात्काळ शोधमोहिम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभाग, पीआरटी (प्रायमरी रिस्पॉन्स टीम), आरआरयू (रॅपीड रिस्पॉन्स युनिट) आणि पोलिस विभागाने संयुक्तपणे रात्रभर शोध मोहिम राबवली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मुलाचा मृतदेह सापडला. त्याच दिवशी मृत मुलाच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. त्यानंतर शासनाकडून 25 लाख रुपयांची मदत देण्याची सूचना वनमंत्री मुनगंटीवार यांनी केली. ही मदत देखील मंगळवार (ता.24) पर्यंत कुटुंबियांना दिली जाणार आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पूर्वी 15 लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. सुधीर मुनगंटीवार वनमंत्री झाल्यानंतर त्यांनी मदतीची ही रक्कम वाढवून 25 लाख रुपये करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. ही मदत लवकरात लवकर मृताच्या कुटुंबीयांना मिळावी, यासाठी सक्षम यंत्रणा देखील त्यांनी तयार केली. त्यामुळे दोन दिवसांत सदर मृत मुलाच्या कुटुंबीयांना ही मदत मिळणार आहे. मृत बालकाच्या कुटुंबियांना मदत जाहिर करताना ना.श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘एखाद्याच्या जीवाची किंमत पैशांत लावता येत नाही. पण कर्ता पुरूष दगावल्यास त्याच्या कुटुंबीयांना आधार म्हणून ही मदत उपयोगी पडते.

Chandrapur : विद्यार्थ्याची गुरुदक्षिणा; विद्यार्थी कोण तर सुधीर मुनगंटीवार!

घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपाययोजना..

सिनाळा फाटा येथे ही दुर्दैवी घटना घडली. तेथे घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना वनमंत्री मुनगंटीवार यांनी केल्या. त्यानुसार वनविभागाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. घटनास्थळाच्या थोडे अलीकडे वन्यप्राण्यांपासून सुरक्षा करण्यासाठी यापूर्वीच दीड किलोमिटरची जाळी लावण्यात आली. पण त्याच्या काही अंतर पुढे ही घटना घडली. त्यामुळे आता त्याच जाळीला जोडून पुढे पुन्हा एक ते दीड किलोमीटरची जाळी सुरक्षेसाठी लावण्यात येणार आहे. याशिवाय जेथे वन्यप्राण्यांचा वावर अधिक असण्याची शक्यता आहे, अशा चार वेगवेगळ्या ठिकाणी पिंजरेदेखील लावण्यात आलेले आहेत. याशिवाय पीआरटी (प्रायमरी रिस्पॉन्स टीम), आरआरयू (रॅपीड रिस्पॉन्स युनिट)ची गस्त पूर्णवेळ सुरू आहे. या परिसरातून मागील काही महिन्यांत 5 बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!