Assembly Election : नागपूर – काँग्रेसच्या नेत्यांनी एवढी वर्षे नागपूर शहराचा विकास रोखून धरला होता. मिहानच्या विरोधात विलास मुत्तेमवार आणि नितीन राऊत या काँग्रेसच्याच नेत्यांनी मोठे आंदोलन केले होते. त्यांना नागपूरचा नव्हे फक्त स्वतःचा विकास करायचा होता, अशी टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ज्या मिहानला काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला तेथे आज मोठ्या कंपन्या आल्या आणि 88 हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे, असंही गडकरी म्हणाले.
गडकरींच्या हस्ते दक्षिण-पश्चिम, पश्चिम व उत्तर नागपूरच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन झाले. ‘काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खोटा प्रचार केला. संविधान बदलणार असल्याचे पसरवले. मात्र या देशात संविधानाचे तुकडे कुणी केले असतील, तर ते काँग्रेसने केले आहेत. आमच्यावर संविधान बदलाचा आरोप करणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत,’ अशी टीका गडकरींनी केली.
‘नागपूर शहराच्या विकासाची ही प्रक्रिया थांबायला नको. कारण हा प्रश्न शहराच्या भविष्याचा आहे. ही उमेदवाराचे भविष्य ठरविणारी निवडणूक नसून जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे,’ असेही ते म्हणाले. 1947 पासून आजपर्यंत देशाच्या इतिहासात काँग्रेसला मुंबई, नागपूर दिल्लीमध्ये राज्य करण्याची संधी मिळाली. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसने सत्ता उपभोगली. दहा वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि त्यापूर्वी चार वर्षे अटलजींच्या नेतृत्वातील भाजपच्या सरकारने मोठ्या प्रमाणात विकास केला, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
द्याल ती शिक्षा भोगायला तयार
उत्तर नागपूरच्या सभेत गडकरींनी लोकसभेतील मतदानाचा मुद्दा छेडला. ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत मी या भागात फिरलो. सभा घेतल्या. पण मला या मतदारसंघातून आघाडी मिळाली नाही. कदाचित माझं काम पडलं असेल. भविष्यात माझं काम सुधारण्याचा मी प्रयत्न करेन, असं गडकरी उपहासाने म्हणाले. त्याचवेळी आम्ही जी कामे दहा वर्षांत केली, ती साठ वर्षांत काँग्रेसने केली असतील तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असंही गडकरी म्हणाले.
नेत्याच्या पोटातून नेता
काँग्रेसमध्ये नेत्याच्या पोटातून नेता जन्माला येत आहे. कुटुंबातच तिकीट वाटले जात आहे. आमच्याकडे सगळे शांत बसले आहेत, कारण माझं पूर्ण लक्ष आहे. मी बजावूनच सांगितलं आहे. माझी पत्नी, मुलं, सुना राजकारणात नाहीत. कारण माझे राजकीय वारसदार माझे कार्यकर्ते आहेत,असंही गडकरी म्हणाले.