Sudhir Mungantiwar : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार नेहमी चांदा ते बांदा, असं म्हणायचे. पण आता ते चांदा ते दिल्ली, असं म्हणायला लागले आहेत. आपल्या विकासाच्या गाडीला काँग्रेसचं पंक्चर चाक लावू नका, असे आवाहन करत काँग्रेसवाल्यांची नार्को टेस्ट केली, तर तेही म्हणतील की, पंतप्रधान तर नरेंद्र मोदीच होणार, असे मुनगंटीवार म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात आज (ता. ८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, उद्या (ता. 9) गुढीपाडवा आहे. उद्यापासून एक नवीन सुरुवात करण्याचा संकल्प करा. काँग्रेसचं पंक्चर चाक विकासाच्या गाडीला लावू नका. काँग्रेसवाल्यांची नार्को टेस्ट केली, तर तेही म्हणतील की पंतप्रधान तर मोदीच होणार. काँग्रेसला मत म्हणजे विनाशाला मत आहे. माफिया राजला मत आहे. आपल्या पायावर धोंडा मारणे आहे.
दारू दुकानांची संख्या एक वरून 117 करणार असतील, आणि त्याला जर काँग्रेसवाले विकास म्हणत असतील, तर तुम्हालाही हे पटतंय का, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी हजारोंच्या समुदायाला केला. हजारोंनी बलिदान दिले, तेव्हा आपल्या बोटाला शाई लागते. देशासाठी मतदान करा, देशीसाठी करू नका. केंद्राच्या योजना तर आणीलच पण महाराष्ट्रातही २९ वर्ष काम करण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीचा कोड नंबर मला अजूनही पाठ आहे, असे म्हणत त्यांनी राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारकडून विकास निधी आणण्याबद्दल आश्वस्त केले.
मोठे बोर्ड लागून जर मतदान झालं असतं, तर निवडणुकीत फक्त बोर्डच लावले असते, असे म्हणत मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचे नाव न घेता टोला लगावला. बोर्डापेक्षा महाविकास युतीचा कार्यकर्ता लोकांच्या मनामनांपर्यंत पोहोचला आहे. त्या बोर्डावर लिहिलं आहे की, हुकूमशाहीच्या विरोधात लढा आहे. आणीबाणी मोदींनी लावली होती का, असा प्रश्न करत. माझे वडील, देवेंद्र फडणविसांचे वडील 19 महिने जेलमध्ये गेले. 1984 दंग्यात पत्नीच्या नजरेसमोर जळत्या ट्रकमध्ये पतीला टाकलं. चार वर्षाच्या मुलासमोर त्याच्या वडिलांना ट्रकमध्ये टाकलं. तुष्टीकरणाचे राजकारण करणारे लिहितात की हुकूमशाही विरुद्ध लोकशाही. लोकशाही बघायची असेल तर हा जनसागर बघा. तेव्हा समजेल लोकशाही काय आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.