महाराष्ट्र

Congress : हे तर जमीन लुटारू सरकार

BJP : वडेट्टीवार यांची टीका; बावनकुळे यांच्यावर निशाणा

Shri Mahalakshmi Jagdamba Mandir Koradi : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी या संस्थेला भूखंड देण्याचा निर्णय झाला. याठिकाणी नवीन महाविद्यालय आणि नर्सिंग होम सुरू होणार आहे. या संस्थेला पाच हेक्टर भूखंड देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. जमीन लुटारू सरकार म्हणून महायुतीची ओळख होत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

चौकशी होईल

माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी ट्रस्टला दिलेल्या जमिनीची किंमत 5 कोटी आहे असे सांगितले. ही जमीन ट्रस्टला स्वस्त दरात देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सरकारने स्वस्त दरात भूखंड दिला. ही एकच घटना नाही. असे अनेक भूखंड भाजपशी जवळीक असलेल्या ट्रस्ट आणि लोकांना देण्यात आले. दोन महिन्यांत मविआ सत्तेत येत आहे. त्यानंतर अशा जमिनींच्या वाटपाची चौकशी सुरू होईल, असेही ते म्हणाले.

भाजपची वृत्ती

वडेट्टीवार म्हणाले, ‘महायुती सरकार जमीन लुटारू म्हणून ओळखले जाते. अनेक शहरातील अनेक महत्त्वाचे भूखंड बिल्डर्स आणि भाजपशी संबंधित ट्रस्टला रेडी रेकनर दरापेक्षा 25 टक्के कमी दराने देण्यात आले. या सरकारने आपल्या कारकिर्दीत जवळपास 5 लाख कोटींच्या जमिनी स्वस्त दरात संस्थांना दिल्या.’

सारेकाही प्रसिद्धीसाठी

कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानला जमीन देताना पक्षपात झाल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फेटाळून लावला. दर दोन वर्षांनी अध्यक्ष निवडला जातो. सध्या मी संस्थेचा अध्यक्ष आहे. आता, जर कोणाला माझ्या नावाचा वापर करून प्रसिद्धी मिळवायची असेल तर त्यांनी खुशाल आरोप करावे, असे बावनकुळे म्हणाले. अनिल देशमुख आणि विजय वडेट्टीवार देखील आई महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद घेतात. नाना पटोले यांचीही कुलदेवता आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देवाच्या नावावर राजकारण नको

पाच हेक्टर भूखंड देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते टीका करत आहे. श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान केवळ धार्मिक कार्यातच नाही, तर सामाजिक कार्यातही सक्रिय आहे, असे स्पष्टीकरण संस्थानचे सचिव दत्तूजी समरितकर यांनी दिले. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून “ब” दर्जा प्राप्त असलेली एक नोंदणीकृत धर्मादाय संस्था आहे. ट्रस्टमध्ये 15 विश्वस्तांचे मंडळ आहे. सर्व निर्णय सल्लामसलत करून घेतले जातात. २०१४ मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांची विश्वस्त मंडळात नियुक्ती झाली. २०१९ मध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. २०२३ मध्ये त्यांची पुन्हा एकदा एकमताने अध्यक्षपदी निवड झाली. ट्रस्टने एकमताने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणे ही ट्रस्ट अध्यक्षांची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.

BJP : चंद्रशेखर बावनकुळे झालेत त्यांच्यापुढे नतमस्तक 

अपूर्ण माहिती का?

या प्रकल्पाची बातमी माध्यमांतून अपूर्ण माहितीच्या आधारावर प्रसारित झाली आहे. संस्थानच्या सर्व निर्णयांचे पालन विश्वस्त मंडळाने एकमताने केलेल्या निर्णयावर आधारित असते. संस्थान कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचे नाही. ते ट्रस्टद्वारे चालवले जाते, असेही संस्थानचे सचिव दत्तूजी समरितकर म्हणाले. संस्थानचा उद्देश व्यावसायिक लाभ मिळवणे नाही. होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे हा आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!