Thane Constituency : ठाण्यातील दिव्यांग कला केंद्र, जिजामाता उद्यान या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद असल्याने अनेक मतदार परत गेले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात आज सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ठाण्यातील नौपाडा येथील एका मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम मशीन हे बंद पडल्या. या मतदान केंद्रावर सकाळ पासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या.
मतदार माघारले
सकाळी 7 वाजता मतदान सुरू व्हायला हवे होते. मात्र, या केंद्रावर मतदान सुरू करण्यात आले नाही. मतदान सुरू न झाल्याने नागरिकांनी केंद्रावरील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विचारणा केली. या वेळी त्यांनी ईव्हीएम सुरू होत नसल्याचे सांगितले. 45 मिनिटे ते तास भर हे मशीन बंद होते. यामुळे या ठिकाणी सकाळी 7 वाजता मतदान होऊ शकले नाही. सकाळी 7 पूर्वीच या मतदान केंद्रावर अनेक मतदारांनी रांगा लावल्या होत्या. मात्र, ईव्हीएम मशीन बंद असल्याने येथील मतदान खोळंबले होते.
वाट बघूनही बराच वेळ मतदान सुरू न झाल्याने काही मतदार मतदान न करताच माघारी गेले.या बाबत या मतदार संघातील लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी निवडणूक आयोगाच्या कामावर नाराजी व्यक्त करत या बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
मुंबईतील सहा जागांसह राज्यातील एकूण 13 जागांसाठी आज मतदान होत आहे. आज मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, ठाणे, कल्याण, पालघर, धुळे, दिंडोरी, नाशिक आणि भिवंडी या जागांवर मतदान पार पडत आहे.
Lok Sabha Election : राजनाथसिंह, राहुल गांधी, श्रुती इराणी यांच्या भाग्याचा फैसला
24,579 मतदान केंद्र
मतदानासाठी एकूण 24 हजार 579 मतदान केंद्र आहेत. तर 2 कोटी 46 लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. 160 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी स्थानिक पोलिसांसह केंद्रीय सुरक्षा यंत्रणेची मदत घेण्यात आली आहे. एकट्या मुंबई शहरात 5 अतिरिक्त पोलिस आयुक्त, 25 पोलिस उपआयुक्त, 77 सहायक पोलिस आयुक्तांसह 25 हजार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. याशिवाय 3 दंगल नियंत्रण पथके, गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह केंद्रीय सुरक्षा दलाच्या 36 तुकड्यांची अतिरिक्त कुमक सज्ज ठेवण्यात आली आहे.