South Nagpur : महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अद्यापही निश्चित झालेले नाही. काही जागांवरून घोडे अडलेले आहे. त्यात दक्षिण नागपूरच्या जागेचाही समावेश आहे. भाजपकडे असलेल्या या जागेवर कॉंग्रेस व उद्धवसेनेने दावा केला आहे. मात्र त्यावर काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे भाजप विरोधातील संघर्षरथावर कोण स्वारी करणार असाच सवाल कायम आहे.
दक्षिण नागपुरात मोहन मते हे भाजपचे आमदार आहे. मागील वेळेस सुधाकर कोहळे यांनी विजय मिळविला होता. दुसरीकडे काँग्रेस नेते गिरीश पांडव अनेक महिन्यांपासून येथून लढण्याच्या तयारीला लागले आहेत. गल्लीबोळातदेखील त्यांचे बॅनर्स व पोस्टर्स झळकले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा अवघ्या चार हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे महाविकास आघाडी त्यांच्यावरच अवलंबून राहील, असे बोलले जात होते.
परंतु, या जागेवर उद्धव ठाकरे गटानेदेखील दावा केला आहे. गेल्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होती. पण जागा भाजपकडे होती. त्यामुळे शिवसेनेचे किशोर कुमेरिया अपक्ष लढले. त्यांना फक्त साडेचार हजार मते पडली होती. दरम्यान, याच मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमोद मानमोडे इच्छुक असण्याची शक्यता आहे. त्यांचीही अवस्था गेल्या निवडणुकीत कुमेरियांसारखीच होती. त्यामुळे शिवसेनेला जागा सोडण्याची शक्यता कमीच आहे.
काँग्रेसपुढे स्वकीयांचेच आव्हान
गिरीश पांडव यांनी दक्षिण नागपूर मतदारसंघात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. पण तरीही काँग्रेसच्या इच्छुकांची यादी मोठी आहे. यामधेय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांचाही समावेश आहे. लोंढे सध्या काँग्रेसमध्ये मोठ्या पदावर आहेत, पण एक विधानसभा त्यांना जिंकता येईल का, याबाबत साशंकता आहे. त्याचवेळी माजी मंत्री विलास मुत्तेमवार यांचे सुपूत्र विशाल मुत्तेमवार देखील इच्छुक आहेत, असे समजते.
काँग्रेस-ठाकरे गटात खडाजंगी
काँग्रेसमध्ये इच्छुकांची यादी वाढत असल्याने आणि शिवसेनेने दावा केल्यामुळे पांडव यांची उमेदवारी सोपी नाही. महाविकास आघाडीच्या गुरुवारच्या बैठकीत दक्षिण नागपूर मतदारसंघावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. दोन्ही बाजूचे नेते या जागेसाठी अडून बसले आहेत. कुणीही एक पाऊल मागे घेण्यास तयार नाही. मोहन मते यांच्याबाबत नकारात्मक वातावरण असल्याची चर्चा झाल्यामुळे काँग्रेस व ठाकरे गटाचा आत्मविश्वास वाढला आहे. पण, त्याचा फायदा प्रत्यक्ष निवडणुकीत किती होणार, हे उमेदवारावरच अवलंबून असणार आहे.