Maharashtra Assembly Elections : महायुती आणि महाविकास आघाडीनंतर आता तिसऱ्या आघाडीचा पर्याय पुढे आला आहे. गुरूवारी (ता. 19) तिसऱ्या आघाडीबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.
राजकीय घडामोडींना वेग
राज्यात विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येत आहे. तसतसा राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष संघटनांकडून निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. अशातच तिसरी आघाडी स्थापन करण्याबाबत घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय देण्यासाठी तिसऱ्या आघाडीकडून पाऊल पुढं टाकण्यात आलं आहे.
19 सप्टेंबर रोजी पुणे येथे तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेणाऱ्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू आदी नेते उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी महायुतीमधून अप्रत्यक्षपणे बाहेर पडल्याचं स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या आघाडीला परिवर्तन महाशक्ती असं नाव देण्यात आलं आहे. 26 सप्टेंबरला परिवर्तन महाशक्तीचा मेळावा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मेळावा होणार आहे.
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू ?
तिसऱ्या आघाडीची बैठक पार पडल्यानंतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘मी महायुतीतून बाहेर पडलो आहे. हे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली’, असे म्हणत महायुतीला सोडचिठ्ठी दिल्याचे जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीतही बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये प्रहारचा उमेदवार देत बंडखोरी केली होती. दरम्यान परिवर्तन महाशक्तीच्या चिन्हाबाबत लवकरच कळवू. जे धार्मिक कट्टरवादी आहेत त्यांना सोबत घेणं आम्हाला जमणार नाही, असंही कडू यांनी सांगितलं.
NCP Vs MNS : जय मालोकार प्रकरणातील तीन तासांचे व्हीडीओ आले समोर !
अनेकदा इशारा
लोकसभा निवडणुकीपासून बच्चू कडू यांनी महायुतीच्या नेत्यांना अनेकदा इशारा दिला होता. अखेर गेल्या काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू होत्या. बैठकाही घेण्यात आल्या होत्या. तर बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार देऊन बंड पुकारले होते. आता तिसऱ्या आघाडीचा पर्याय समोर आल्यानं बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.