Nagpur constituency : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत. विदर्भाच्या दृष्टीने ही आनंदाची गोष्ट आहे. गेल्या सात-आठ वर्षांत विदर्भाचा बॅकलॉग भरून निघाला नाही. आता हा बॅकलॉग भरून निघण्याची अपेक्षा आहे. महत्वाचं म्हणजे आता देवेंद्रजींना कुबड्यांची गरज नाही. ज्या कुबड्या आहेत, त्या फडणवीसांवर अवलंबून आहेत, असा टोला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लगावला.
आता फ्री हॅंड..
आज (29 नोव्हेंबर) वडेट्टीवार नागपूर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, फडणवीसांना आता फ्री हॅंड काम करण्यापासून कुणी थांबवू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना विदर्भाचं लेकरू म्हणून विदर्भाचा बॅकलॉग त्यांनी भरून काढला पाहिजे. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचा बॅकलॉग असेल, शिक्षणामध्ये आपण मागे आहोत. या सर्व पातळ्यांवर विदर्भाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा अपण ठेऊया.
फडणवीस बदल्याचे राजकारण करतात. (म्हणजे कर्मचाऱ्यांच्या बदल्या नव्हे) बदला घेण्याचे राजकारण करतात, असा ठपका फडणवीसांवर पडला होता. तो ठपका पुसून निघेल, अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवायला हरकत नाही. कारण राजकारणात वैचारिक लढाई असावी. वैयक्तिक कुणी कुणाचे वैरी असू नये. त्यामुळे त्यांच्या संदर्भात महाराष्ट्रात जी त्यांची ईमेज होती, ती पुसून निघेल. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते नाव करतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
एकनाथ शिंदे यांचा चेहरा सद्यस्थितीत पडलेला दिसतोय, असे विचारले असता, स्वाभाविक आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याला सत्ता मिळूनही सत्तेची सर्वोच्च खुर्ची मिळत नसेल तर त्यांचा चेहरा पडलेला दिसणं स्वाभाविक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार
यांची उपयुक्तता आता संपल्यात जमा झाली आहे. त्यांना सत्तेमध्ये मोदी आणि शाह यांच्या आशीर्वादानेच राहता येईल. अन्यथा ते काहीही करू शकणार नाहीत. एखादी गोष्ट पटली नाही, तरीही ते विरोध करू शकणार नाहीत. सत्ता नाही दिली तरी गुपचूप बसण्याशिवाय त्या दोघांकडे कुठलाही पर्याय नाही.
उपमुख्यमंत्रिपद मोठं
दोन उपमुख्यमंत्री पूर्वीही होते. आताही असणार आहेत. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागेल. पक्ष चालवायचा आहे, तर तसं करावं लागेल आणि त्यात काही गैर नाही. मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांनी मंत्रीपदंसुद्धा घेतलेली आहेत. तुलनेत उपमुख्यमंत्रिपद मोठं आहे. देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुख्यमंत्रिपदानंतर उपमुख्यमंत्रिपद घेतलं होतंच. त्यामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्यात काहीही गैर नाही, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.