Congress : भाजपवाले निवडणुका लढताना अनेक घोळ करतात. मतमोजणी मध्येही दबाव टाकून गोंधळ निर्माण करतात. 2019च्या निवडणुकीत याचा अनुभव आला. त्यामुळे यावेळी ‘पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचे नाही’, अशा सूचना आम्ही उमेदवारांसह त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींना दिल्या आहेत, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नागपुरात शुक्रवारी (22 नोव्हेंबर) वडेट्टीवार पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, उद्या सत्तेतला आमदार म्हणून मी असेल, असा मला विश्वास आहे. केवळ विश्वासच नव्हे, तर खात्री आहे. महा विकास आघाडी सत्ता स्थापनेचा दावा उद्या रात्रीच करणार आहे. 160 ते 165 जागा महा विकास आघाडी जिंकल्याशिवाय राहणार नाही. एक्झिट पोल वगैरे काय ते नंतर बघू.
आमच्या सगळ्या लोकांना उद्याच्या काऊंटींगसाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. काय काळजी घेतली पाहिजे, ते सांगितलेलं आहे. पूर्ण मतमोजणी होईपर्यंत मतदान केंद्र सोडायचं नाही, अशा सूचना दिलेल्या आहेत. कोण सत्तेत येईल, ते उद्या कळेलच. उद्या 12 ते 1 वाजता चित्र स्पष्ट होईल. महाराष्ट्रातून महायुती हद्दपार झालेली महाराष्ट्राला दिसेल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
कुठल्याही पदाबाबत हायकमांड जो निर्णय घेईल, तो माझ्यासाठी अंतिम असेल. दोनदा विरोधी पक्ष नेतेपद मी सांभाळलेलं आहे. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, मायक्रो ओबीसीच्या व्यक्तीला जबाबदारी दिली आहे. मी प्रामाणिकपणे आणि अतिशय समर्थपणे ती पार पाडली आहे. उद्या सत्ता येणार आणि सत्तेमध्ये मी असणार, असा विश्वासही आमदार वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
जे काम हाती घेतलं ते काम प्रामाणिकपणे पूर्ण केलं. बारा तासांच्या आत मुख्यमंत्रीपद आम्ही घोषित करू. उद्या (23 नोव्हेंबर) सगळ्यांना आम्ही रात्रीच मिळेल त्या वाहनाने बोलावलेले आहे. विदर्भातील सर्वांना घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर हाय कमांडने सोपवलेली आहे, तीसुद्धा पार पाडणार आहे. आजची बैठक जबाबदारीची होती. काय करायचं, यासंदर्भात पवार साहेबांनी सांगीतलेचं आहे. मल्लिकार्जुन खर्गे आम्हाला वारंवार सूचना करत आहेत.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार
कोणी कोणती जबाबदारी पार पाडायची हे ठरलेलं आहे. परवा सत्ता स्थापनेचा मंडप दिसेल. 12 तासांत महा विकास आघाडी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा देणार, असाही दावाही, वडेट्टीवार यांनी केला. जेवढी काँग्रेसच्या विचारसरणीची मंडळी आहे, ती आमचीच आहे. बंडखोरी केली असेल किंवा अपक्ष असतील, त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांच्यात आहे. त्यांच्याबाबत पक्ष श्रेष्ठींनी चर्चा सुरू केली असावी, असा अंदाज आहे.
काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळावं, ही काँग्रेस जणांची इच्छा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचीही इच्छा आहे. पण तिन्ही पक्ष एकत्र येऊन जो निर्णय घेतील, तो अंतिम असेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगीतले.