BJP On Mahavikas Aghadi : महायुतीनं लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेतून महिलांना दीड हजार रूपये देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राज्य दिवाळखोरीत निघेल अशी टीका महाविकास आघाडीने केली. काँग्रेसच्या चट्ट्याबट्ट्यांनी हायकोर्टात केस दाखल करून लाडकी बहिण योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. आता तेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले राज्यभरातील महिलांना तीन हजार रुपये देण्याचं आमिष दाखवित आहे, अशी टीका राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
रविवारी (10 नोव्हेंबर) नागपुरात प्रचार माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी काँग्रेसचा बुरखा फाडला. जे लोक दीड हजार रुपयांना विरोध करीत होते आता ते तीन हजार रुपयेही द्यायला तयार झाले आहेत. त्यामुळं काँग्रेस आणि महाविकास आघाडीवाले किती खोटारडे आहेत, हे सिद्ध झालं आहे. काँग्रेसनं काही महिलांचे व्हिडीओ तयार केले. या व्हिडीओमध्ये त्यांच्या कार्यकर्त्या महिला आम्हाला दीड हजार रुपये नको, असं सांगताना दिसतात. आता हेच लोक योजनेचा लाभ घेत आहेत. काही वर्षांपूर्वी ‘चाची चारसौ बीस’ हा चित्रपट आला होता. तशीस ‘काँग्रेस चारसौ बीस’ असल्याचा घणाघातही मुनगंटीवार यांनी केला.
जनतेशी प्रेम नाही
काँग्रेसचे जनतेशी काहीच प्रेम नाही. आता काँग्रेसचे काही नेते देशात फिरत आहेत. स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष झाले तरी रस्ते नाही, मूलभूत सुविधा नाही असा प्रचार ते करीत आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेसचेच सरकार देशात होते, याचा त्यांना विसर पडला आहे. महा वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात रस्ते झाले आहेत. महाविकास आघाडीनं प्रकाशित केलेला जाहीरनामा हा ‘झुटानामा’ आहे, असंही मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केलं. राज्याला जातनिहाय जनगणना करण्याचा कोणताही अधिकार नाही. हा अधिकार केवळ केंद्र सरकारला आहे. त्यामुळं जनगणना करण्याचं वचन खोटं आहे, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
सत्तेसाठी काँग्रेस जातीपातीचं हजर पेरत आहे. त्यामुळं देशाचं मोठं नुकसान होणार आहे. काँग्रेसची ही नीती भविष्यात फार धोक्याची ठरणार आहे. जातीधर्मात भांडणं लागणार आहेत. महाविकास आघाडीनं आपल्या मनाला येईल तसा आकडा काढला आहे. ते सत्तेतच येणार नाहीत. त्यामुळं लोकांना आकडे सांगायला काय जातं, असं त्यांचं गणित आहे. काँग्रेस सत्ताकाळातील पंतप्रधानांच्या काळात अनेक पूल कोसळले. रेल्वेचे अपघात झालेत. विमानांचे अपघात झाले. विमानांचे अपहरण झालेत. 1983 मध्ये गोसीखुर्दचं भूमिपूजन केलं. आजपर्यंत प्रकल्पाचं काय झालं, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
पवारांना शुभेच्छा
शरद पवार यांच्या सत्ताबदलाच्या वक्तव्यावर मुनगंटीवार म्हणाले की, शरद पवार यांनी आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभावे. त्यानंतर 50 वर्षांनंतर कदाचित केंद्रात व महाराष्ट्रात त्याचं सरकार आलं तर त्यांनी ते बघावं. व्यक्ती वृद्धावस्थेकडे वळल्यानंतर त्याला आपण या सगळ्या मोहमायेपासून दूर जावं असं वाटतं. पण महायुतीवर इतका राग की, आम्हाला हटविल्याशिवाय उसंत घेणार नाही, असं वक्तव्य करणं आश्चर्यकारक असल्याचंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.