Assembly Election : नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांमधील आर्थिक दरी वाढवली आहे. काही लोक अतिशय श्रीमंत झाले आहेत. काही लोक मोठ्या प्रमाणात गरिबीत जगत आहेत. मोदींच्या नव्या भारतात रात्रीच्या अंधारात आमदार-खासदार विकत घेतले जात आहेत. राज्यपाल सुद्धा आता पहाटेच्या आणि रात्रीच्या शपथविधीसाठी काम करीत आहेत, अशी टीका मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी केली. ते नागपुरात बोलत होते.
विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहत आहेत. त्यातच सर्वपक्षांनी आपला जोर निवडणुकीसाठी लावला आहे. या निवडणुकीत काही पक्ष जनतेला विसरले आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी वातावरण तापले आहे. काँग्रेस आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू आहेत. निवडणुकीमुळे जनतेच्या राजकीय पक्षांपासूनच्या अपेक्षा वाढल्या आहेत. नागरिकांच्या भल्यासाठी काहीतरी झाले पाहिजे, असे पटवारी म्हणाले.
योगींकडून जातीवाद
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येतात. योगी थेट जातीवादाचा उल्लेख करतात. हिंदू-मुस्लीम असे त्यांच्या तोंडी वाक्यच बसलेले आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’, अशी भाषा भाषणाच्या वेळी योगी वापरतात. हे वाक्य योग्य आहे का? योगींबद्दल जनतेला पुरेपूर समजले आहे. विधानसभा निवडणुकीत या सर्व गोष्टीचा निकाल होईल, असेही स्पष्ट मत पटवारी यांनी व्यक्त केले
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील घटना दु:खद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. हा पुतळा कोसळला. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 35 फुटांचा पुतळा कसा काय पडू शकतो, असं पटवारी म्हणाले. भाजपच्या भ्रष्टाचारामुळे हा पुतळा कोसळला. पटवारी यांनी पुतळ्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. असाच भ्रष्टाचार लाडकी बहीण योजनेत झाला आहे. मध्य प्रदेशात या योजनेअंतर्गत भ्रष्टाचार झाला आहे. आता महाराष्ट्रातही याच दिशेने काम सुरू आहे, असा आरोप जितू पटवारी यांनी केला.
आघाडी जनहिताची
जितू पटवारी यांनी उद्धव ठाकरे सरकारसोबत झालेल्या गद्दारीबद्दलही भाजपवर टीका केली. महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या घोषणा आम्ही पूर्ण करू. काँग्रेस ही सामान्य जनतेसाठी लढणारी पार्टी आहे. आम्ही जाती आधारित जनगणनेची मागणी केली आहे. ती पूर्ण करणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. नितीन गडकरी यांची प्रशंसा करताना पटवारी यांनी नागपूरच्या खराब रस्त्यांवर टीकाही केली. गडकरी यांनी देशात चांगले रस्ते बांधले. पण नागपूरमध्ये धूळच धूळ दिसत आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी भाजप सरकारने काहीच केले नाही. आत्महत्या थांबवण्यासाठी भाजपा सक्षम नसल्याचेही जितू पटवारी म्हणाले.