महाराष्ट्र

Nagpur : गडकरींचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम!

Nitin Gadkari : यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावावर संतापले; कारवाई करण्याचा इशारा

Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासमध्ये जनता दरबार घेतला. दोन्ही प्रसंगांना नागरिकांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची तक्रार गडकरींकडे केली. त्यानंतर गडकरींनी पंधरा दिवसांनंतर आढावा घेईल असे म्हटले होते. पण त्यापूर्वीच गडकरींनी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला आहे. विकास यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावावर त्यांनी बोट ठेवले आहे. एवढेच नव्हे तर असाच कारभार सुरू राहिल्यास कठोर कारवाईचा इशाराही गडकरींनी दिला आहे.

रस्ते बांधकाम व विकासाच्या कामांच्या संदर्भात नागपूर शहरातील विकास यंत्रणांचा आपसात समन्वय नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. यावर गडकरींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ पाऊल उचलावे. अन्यथा संबंधित यंत्रणांमधील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करू, असा इशारा गडकरींनी दिला आहे.

अलिकडेच गडकरींनी नागपूर महापालिका आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या कामांसंदर्भात जनता दरबार केला. नागरिकांनी या दोन्ही यंत्रणांबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. गडकरींना आपल्या अडचणींची, त्रासाची निवेदनेही दिली. याशिवाय, अनेक लोकप्रतिनिधींनी विकास कामांतील समन्वयाचा अभाव निदर्शनास आणून दिला. आणि त्याच्या परिणामी नागरिकांना होत असलेला त्रासही गडकरींच्या निदर्शनास आणून दिला.

गडकरी म्हणतात, ‘कुणीही येतो रस्ता खोदतो’

या पार्श्वभूमीवर गडकरींनी एक वक्तव्य जारी केले आहे. ‘गणेशोत्सव, दुर्गोत्सव, दसरा, दिवाळी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन यासारखे प्रसंग तोंडावर आलेले आहेत. असे असताना नागपूर शहरातील विकास यंत्रणांमध्ये आपसात समन्वय दिसत नाही. रस्त्यांच्या कामांच्या संदर्भात तर हे प्रकर्षाने दिसत आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे. त्यामुळे रोगराई वाढत चालली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर महापालिका, नासुप्र, मेट्रो रेल्वे, विद्युत विभाग, टेलिफोन विभाग यांच्यात कोणताही समन्वय नाही. कुणीही येतो आणि तयार झालेला रस्ता खोदतो. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते, असा उल्लेख गडकरींनी केला आहे.

कारवाईसाठी तयार राहा

प्रदूषण वाढतं आणि नागरिकांना त्रास होतो. सतत छोटे मोठे अपघात होतात. सर्व संबंधित यंत्रणा आणि विभागांनी आपसात समन्वय साधून विकास कामे केल्यास असे प्रश्न उपस्थित होणार नाहीत. त्यामुळे आता या यंत्रणा आणि संस्थांच्या प्रमुखांनी यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांचा त्रास संपवावा किंवा कारवाईस सामोरे जाण्यासाठी तयार राहावे, असा इशाराही गडकरींनी दिला आहे.

विकासकामांचे समाधान, पण..

नागपुरातील विकास कामे जोरात सुरू आहेत. पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले जात आहे. विकासकामे होत आहेत, याचे समाधान आहे. पण, विकासाचा त्रास नागरिकांना होत असेल तर त्याबद्दल संबंधित यंत्रणांनी जागरूक असले पाहिजे. रस्त्यांच्या बांधकामात लेव्हल तपासून पुढे जाणे, पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था राखणे, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेणे हे सारे होत नाही. त्यामुळे विकासकामांबद्दल आस्था वाटण्याऐवजी नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत, या शब्दांत गडकरींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Gondpipari President : बिलावर स्वाक्षरीसाठी आर्थिक मागणी 

तर जबाबदारी निश्चित करेन

शहरातील ज्या भागांत रस्त्यावर मेट्रो स्टेशन तयार झालेले आहेत, त्या स्टेशनच्या समोर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांना त्रास होत आहे. सणासुदीच्या दिवसात रस्ते व बाजारपेठांमध्ये गर्दी वाढते. त्याचा विचार करता सर्व विभागांनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कामांचा आढावा घ्यावा. आपसातील समन्वयानेच कामे पुढे जातील, याची काळजी घ्यावी, असे निर्देश गडकरींनी दिले आहेत. असे झाले नाही, तर जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!