Assembly Election : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत हिंदू समुदायाला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यांच्यानंतर इतर भाजपा नेत्यांनी व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी हा नारा उचलून धरला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी योगींच्या या वाक्याला धरत जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात येऊन राजकारण करण्यापेक्षा आपल्या उत्तर प्रदेश मध्ये हे राजकारण करावे, असे देखील आमदार पटोले म्हणाले
उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन जातीय सलोखा भंग करीत आहे. त्यांचे हे जातीवादाचे राजकारण त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये ठेवावे. महाराष्ट्रात येऊन हे घाणेरडे आणि गलिच्छ राजकारण त्यांनी करू नये. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार आहे. योगी यांनी आपले स्वतःचे विचार घेऊन महाराष्ट्रात द्वेष पसरवू नये. भाजपच्या काळात उरूस, गणेश उत्सवाच्या वेळी जातीय दंगली जास्त प्रमाणात घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचे हे जातीय विष पसरविण्याचं महत्त्वाचं काम करीत असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.
दाऊदही चालेल
नवाब मलिक सारखे उमेदवार भाजपचा असू शकतो तर दाऊद का असू शकत नाही. नक्कीच दाऊद यांचा उमेदवार राहिल, असेही पटोले म्हणाले. गुजराती नेते महाराष्ट्रात येऊन उत्तर प्रदेश, बिहारचे नाव घेतात. महाराष्ट्राची बदनामी करतात. महायुती आणि भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पोहोचविले. दहा कोटींपेक्षा जास्त उद्योग गुजरातला गेले. तेवढ्याच कोटी युवकांना नोकरी देऊ शकलो असतो, हे महायुतीच्या लक्षात आलं नाही. काँग्रेसवर आरोप करायला महायुती आणि भाजपला लाज का वाटत नाही? असे सवाल आमदार नाना पटोले यांनी केला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात येऊन फक्त जातीय भाषा करतात. भाजपला आणि महायुती सरकारला दुसरे काही कामच नाही. या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बेरोजगारी महागाई या गोष्टीवर बोलले पाहिजे. या सर्व गोष्टींकडे यांच्याकडे वेळच नाही. मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर त्यांनी बोलायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या प्रतिमेवर पैसे खाणारे हे लोक आहेत. हेच लोक काँग्रेसवर आरोप करतात. योगींसारखे व्यक्ती महाराष्ट्रात येऊन घाण पसरवितात. महाराष्ट्रातील जनता या गोष्टी पचवणार नाही. यांना चांगलाच धडा शिकवेल, असेही पटोले म्हणाले.
आत्महत्या पर्याय नाही
भाजप शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचा फायदा त्यांनी कधीच पाहिला नाही. त्यांना फक्त जातीय राजकारण आवडते. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यायला हवा. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सोयाबीन, धान, कापूस आणि मुख्यतः दूध यांना एमएसपीपेक्षा जास्त भाव देऊ, असे आश्वासन आमदार नाना पटोले यांनी दिले. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. महाविकास सरकार येईल आणि शेतकऱ्यांना नक्कीच न्याय मिळेल, असेही नाना पटोले म्हणाले