Political war ‘आमचे सरकार आल्यावर आम्ही बहिणींना 3 हजार रुपये देऊ’, अशी ग्वाही देऊन राज्याचे माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज (सोमवार, दि.१९) दिली. त्यांनी या विधानामुळे अप्रत्यक्षरित्या महायुती सरकारच्या योजनेचे समर्थनच केले आहे, असे आता बोलले जात आहे.
‘महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी नव्हे तर लाडक्या खुर्चीसाठी ही योजना आणली आहे. ही योजना फक्त तीन महिन्यांसाठी आहे. महायुती सरकारने तेवढ्याच कालावधीचे नियोजन केले आहे. कारण निवडणुकीनंतर यांचे सरकार जाणार आहे. त्यानंतर आमचे सरकार येईल आणि आम्ही बहिणींना 3 हजार रुपये देऊ,’ असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. देशमुख यांच्या विधानाची आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
निवडणुकीला घाबरत नाही
राज्यातील विधानसभा निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले, ‘महायुती सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे. सरकारच्याच दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला असण्याची शक्यता आहे. कारण नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. अशात लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला, तोच विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, याची भीती महायुतीला आहे. त्यामुळेच निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
हिंमत असेल तर अॉक्टोबरमध्ये घ्या
विधानसभा निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता बळावली आहे. निवडणुका डिसेंबरमध्ये झाल्यास २६ नोव्हेंबरनंतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. अशात देशमुखांनी महायुतीला आव्हान दिलं आहे. ‘हिंमत असेल तर अॉक्टोबरमध्ये निवडणुका घ्या. हे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही,’ असे आव्हान देशमुखांनी दिले आहे.
शेतकऱ्यांकडे लक्ष नाही
‘मोसंबीची गळती सुरू आहे. याकडे शासनाचे लक्ष नाही. अनेक तालुक्यात जाऊन आलो आणि पाहणी केली. सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. सोयाबीनला, कापसाला भाव दिले नाहीत. 5 हजार रुपये प्रति हेक्टर मदत जाहीर केली. उलट ई-पीक पाहाणीची अट घातली. अनेक शेतकऱ्यांनी ई-पीक लोड केले नाही, केवळ 10 टक्के शेतकऱ्यांनी केली. शेतकऱ्यांना मदत मिळू नये म्हणून ही अट सरकारने टाकली आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी अट रद्द करावी,’ अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
तिघे मिळून मुख्यमंत्री ठरवतील!
महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, उद्धव ठाकरेंना समर्थन मिळेल का, अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहे. यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, ‘मुख्यमंत्री पदाचा चेहरा शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे मिळून ठरवतील.’